ED Summons Aishwarya Rai Bachchan : पनामा पेपर (Panama Papers Leak Case) लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. अशातच ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भात माहिती दिली. 


पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीचा तपास सुरु 


दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं. तेव्हा ईडीनं याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.



काय आहे बच्चन कुटुंबाचे पनामा पेपर लीक कनेक्शन?


2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 1.5 कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश होता. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होते. या कंपनी 1993 मध्ये तयार केले गेले. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स मध्ये होते.  या सर्व कंपन्या शेल म्हणेजच फक्त कागदावर असणाऱ्या खोट्या कंपन्या होत्या ज्यांचा वापर कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा लीगल करण्यासाठी वापरल्या गेल्याचा आरोप आहे.  तपासामध्ये असं दिसनू येत आहे की  या कंपन्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्याची किंमत कोट्यावधी होती. पण पेपर वर फक्त 5 हजार ते 50 हजार डॉलर्सची भांडवल असल्याच दाखले गेलं. 


ऐश्वर्याला या पैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते. ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.


महिन्याभरापूर्वी अभिषेक बच्चनचीही चौकशी 


पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरु आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या एपिसोडमध्ये महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर लवकरच त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे.


पनामा पेपर्समध्ये भारतातील कोण कोण आहे?


भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं. 


इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झाला होता. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचं सांगितलं जात होतं. 


इंडियन एक्स्प्रेसने मागे प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश करण्यात आला होता.


पनामा पेपर्स काय आहे?


पनामा पेपर्स काल रात्रीपासून ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये आज हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.


11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.