एक्स्प्लोर
स्टम्प उखडून कोहलीला भोसकू वाटलं होतं : कोव्हान

मुंबई: नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा रडीचा डाव जगाने पाहिला. कधी विराट कोहलीला शिवीगाळ, कधी मुरली विजयबद्दल आक्षेपार्ह शब्द, तर कधी ऑस्ट्रेलियन माध्यमांनीच कोहलीवर डागलेली तोफ, यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चिडकेपणा सातत्याने समोर आला. आता तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इड कोव्हानने, विराट कोहलीला स्टम्पने भोसकू वाटलं होतं, असं सांगितलं. "एका क्षणी स्टम्प उखडून कोहलीला भोसकावं असं वाटलं होतं", असं इड कोव्हान म्हणाला. 'फॉक्स स्पोर्ट'शी बोलताना कोव्हानने आपली घातकी इच्छा बोलून दाखवली. अर्थात माझी इच्छा अयोग्य होती, अशी पुष्टीही कोव्हानने जोडली. "एका सामन्यादरम्यान मैदानावर कोहलीशी वाद झाला होता. कोहलीने त्यावेळी असा शब्द वापरला होता, जो फारच वाईट होता. कोहलीचं ते बोलणं माझ्या खूपच मनाला लागलं होतं. त्यावेळी पंचांनीही कोहली अती करत असल्याची ताकीद दिली होती. त्यानंतर कोहलीने माफीही मागितली. मात्र त्यादरम्यान स्टम्प उखडावी आणि कोहलीला भोकसावं असं मला वाटलं होतं", असं कोव्हान म्हणाला. कोव्हान नेमकं काय म्हणाला? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान क्रिकेट मालिका सुरु होती. त्या मालिकेदरम्यान माझी आई खूपच आजारी होती. मात्र एका सामन्यात विराटने मला खूपच वाईट शब्द वापरले, जे अत्यंत टोचणारे होते. अंतर्गत गोष्ट जी अत्यंत संवेदनशील होती, त्याबाबत कोहली बोलला. मात्र त्याने परिसीमा गाठल्याचं त्याच्या लक्षात तेव्हा आलं, जेव्हा अंपायर स्वत: येऊन विराटला आता हद्द झाल्याचं सांगितलं. त्यावेळी विराट मागे हटला आणि माफी मागितली. मात्र त्यादरम्यान स्टम्प उखडून कोहलीला भोसकावं, असं वाटलं होतं. दरम्यान, मी कोहलीचा फॅन असल्याचंही कोव्हान म्हणाला. "मी कोहलीचा मोठा फॅन आहे. मला चुकीचं समजू नका, तो एक उत्तम क्रिकेटर आहे", असं कोव्हानने नमूद केलं. 34 वर्षीय कोव्हानने 2011 मध्ये भारताविरोधात मेलबर्न कसोटी पदार्पण केलं होतं.
आणखी वाचा























