Vinesh Phogat Bajrang Punia : भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही तिकीट काँग्रेसकडून जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी आज विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
बजरंग आणि विनेश कुठून निवडणूक लढवणार?
सध्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग पुनिया हे बदलीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर विनेश फोगाट जुलानामधून निवडणूक लढवणार आहेत. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काही दिवसांपासून कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही निवडणूक लढवणार असल्याचे आज निश्चित झाले.
निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर विनेश काय म्हणाली?
गेल्या शनिवारी शेतकरी आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाल्याबद्दल विनेश फोगाट यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. ती शंभू आणि खनौरी सीमेवर गेली होती. यादरम्यान विनेशला विचारण्यात आले की ती निवडणूक लढवणार का? यावर कुस्तीपटूने उत्तर दिले की, तिला राजकारण कळत नाही, परंतु ती शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा देते.
27 ऑगस्ट 2024 रोजी हरियाणातील जिंद येथे एका कार्यक्रमात विनेश फोगाटने राजकारणात येण्यासाठी तिच्यावर दबाव असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत आपण आपल्या वडिलांचा सल्ला घेणार असल्याचेही तिने सांगितले. विनेश म्हणाली होती की, जेव्हा तिचं मन स्थिर आणि स्वच्छ असेल, तेव्हा ती पुढे काय करायचं याचा विचार करेल.
काँग्रेस लवकरच उमेदवार करणार
काँग्रेस एक-दोन दिवसांत हरियाणातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारपर्यंत 90 पैकी 66 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. मात्र, नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
हे ही वाचा -
Ajay Ratra : BCCIची मोठी घोषणा! अजित आगरकरच्या टीममध्ये नव्या सदस्याची एन्ट्री, कोण आहे अजय रात्रा?