Ajay Ratra appointed member of Men's Selection Committee : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी अजय रात्रा याची पुरुष निवड समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये सलील अंकोला यांची जागा अजय रात्रा याचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयचे सरचिटणीस जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. समितीचे इतर सदस्य शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरत आहेत.
कोण आहे अजय रात्रा?
अजय रात्रा हा भारताचा माजी खेळाडू आहे. यष्टिरक्षक फलंदाज अजय रात्रा याने सहा कसोटी आणि 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम केले आहे. अजय रात्रा 2023 च्या वनडे मालिकेत भारतीय प्रशिक्षक संघाचा देखील एक भाग होता.
अजय रात्रा यांनी 19 जानेवारी 2002 रोजी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. मात्र, रात्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संपुष्टात आली. भारताकडून खेळल्या गेलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये अजयने 18 च्या सरासरीने 163 धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटीतही शतक आहे. याशिवाय 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 90 धावा केल्या आहेत.
2002 मध्येच अजय रात्राला दुखापत झाली होती, त्यानंतर तो टीम इंडियातून बाहेर गेला. पार्थिव पटेलने त्याची जागा घेतली आणि तो कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण क्रिकेटर बनला. यानंतर रात्रा कधीही टीम इंडियामध्ये परत येऊ शकला नाही. पार्थिवनंतर, दिनेश कार्तिक आणि नंतर एमएस धोनीने संघात स्थान मिळवले आणि रात्राची कारकीर्द केवळ 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरती मर्यादित राहिली.
प्रथम श्रेणीमध्ये अजय रात्राचा रेकॉर्ड
अजय रात्रा याने 99 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4029 धावा केल्या आणि 89 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1381 धावा केल्या होत्या. त्याने 17 टी-20 सामनेही खेळले, ज्यामध्ये 99.47 च्या स्ट्राइक रेटने 191 धावा केल्या. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 233 झेल आणि 27 स्टंपिंग केले. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 12 झेल आणि एक स्टंपिंग केली आहे.
अजय रात्रा याने घेतील सलील अंकोला यांची जागा
सलील अंकोला यांच्या जागी अजय रात्रा समितीत सहभागी होणार आहेत. सलील अंकोला यांने त्याच्या कारकिर्दीत एक कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यात त्याने अनुक्रमे 2 आणि 13 विकेट घेतल्या. कसोटीत त्यांच्या एकूण 6 धावा आणि वनडेत 34 धावा आहेत. सलील अंकोला यांनी 54 प्रथम श्रेणी आणि 75 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत. यामध्ये त्यांनी अनुक्रमे 181 आणि 70 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -
Ugandan Olympic Athlete : धक्कादायक! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या धावपटूला बॉयफ्रेंडने जिवंत पेटवलं
क्रीडा जगतात पाकिस्तानची नाचक्की; दिग्गज कुस्तीपटूकडून काढून घेतले जिंकलेले मेडल, जाणून घ्या प्रकरण