पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) चौथा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला आहे. नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker)आणि सरबज्योत या दोघांनी मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. मनू भाकरनं एकाच ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक मिळवण्याचा इतिहास रचला. स्वतंत्र भारतात एकाच ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या नंतर भारताला आणखी दोन गुड न्यूज पॅरिसमधून मिळाल्या. भारताच्या हॉकी (Indian Hockey Team) संघानं आयरलँडला 2-0 अशा फरकानं पराभूत केलं. भारताचा हा ऑलिम्पिकमधील तिसरा सामना होता. या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं (Harmanpreet Singh) दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. भारत हॉकीच्या ब गटात आहे.
भारताच्या हॉकी संघाचं पुढचं पाऊल
भारतीय हॉकी संघानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिकंलं होतं. यावेळी त्यांच्याकडून सुवर्ण किंवा रौप्य पदकाची आशा देशातील नागरिकांना आहे. त्या दिशेनं भारताच्या हॉकी संघाची वाटचाल सुरु आहे. भारतानं आज आयरलँडला 2-0 असं पराभूत केलं आहे. भारतानं सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलं. आयरलँडला गोल करण्यापासून रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. अखेर भारतानं आयरलँडला2-0 अशा फरकानं पराभूत करत विजय मिळवला. भारतानं आयरलँड विरुद्ध एक गोल पेनल्टी स्ट्रोक आणि पेनल्टी कॉर्नरवर केला. भारताकडून दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगनं केले.
भारत हॉकीमध्ये ब गटात पहिल्या स्थानावर
भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सामने जिंकले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सोडवण्यात संघाला यश आलं आहे. भारतानं पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला 3-2 असं पराभूत केलं होतं. त्यानंतर काल अर्जेंटिना विरुद्ध भारतीय संघ पराभावच्या छायेत होता. मात्र, कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं 58 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. तर, आज झालेल्या मॅचमध्ये भारतानं आयरलँडला 2-0 असं पराभूत केलं. या विजयासह भारतीय हॉकी संघ 7 गुणांसह ब गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अर्जेंटिनानं न्यूजीलँडला पराभूत केल्यास भारताचं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होईल.
चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज उपांत्यपूर्व फेरीत
भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी यांनी देखील इंडोनेशियाच्या संघाला पराभूत केलं आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी यांनी 21-13 आणि 21-13 अशा फरकानं इंडोनेशियाच्या खेळाडूंना पराभूत केलं. दरम्यान, मनू भाकरनं भारताला दोन कांस्य पदक जिंकवून दिल्यानंतर अजून एक पदक ती जिंकवून देऊ शकते. 2 ऑगस्ट रोजी ती 25 मीटर एअर पिस्टल शुटिंगमध्ये सहभागी होईल.
संबंधित बातम्या :
भारताच्या लेकीने मनं जिंकली; एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली, मनू भाकर पहिली खेळाडू ठरली!