पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारतासाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. भारताची दोन कांस्य पदकं थोडक्यात हुकली. भारताची पैलवान निशा दहिया हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर कोरियाची पैलवान पाक सोल गम हिनं निशा दहिया हिला 10-08 नं पराभूत केलं.
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेल्या निशा दहियानं उत्तर कोरियाची पैलवान पाक सोल गम हिच्या विरोधात सुरुवातीला आक्रमक खेळ केला होता. निशा दहिया सुरुवातीला 4-0 अशी आघाडीवर होती. त्यानंतर निशा दहियानं पुढील तीन मिनिटं बचावात्मक खेळ करत उत्तर कोरियाच्या पैलवानाला एकही गुण मिळू दिला नाही.
कांस्य पदक जिंकण्याची संधी
ऑलिम्पिक स्पर्धेत निशा दहिया हिचा पराभव झाला असला तरी तिला अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. उत्तर कोरियाची पैलवान पाक सोल गम अंतिम फेरीत पोहोचल्यास रेपचेज नियमानुसार निशा दहियाला कांस्य पदकासाठी मॅच खेळू शकते.
मॅचच्या दुसऱ्या सत्रात पाक सोल गम हिनं आक्रमक खेळ करत निशावर वर्चस्व मिळवलं. मात्र, निशानं तिला रिंगमधून बाहेर काढत 6-1 असं वर्चस्व मिळवलं. त्यानंतर निशा दहियानं 8-1 अशी आघाडी घेतली. मात्र, या दरम्यान निशा दहिया गंभीर जखमी झाली. त्यावेळी मॅच संपण्यासाठी 1 मिनिट बाकी होतं. मात्र, दुखापतीमुळं वेदना अधिक होत असल्यानं तिच्यावर उपचार करावे लागले. उपचार केल्यानंतर दहिया खेळत असताना उत्तर कोरियाची पैलवान पाक सोल गम हिनं आक्रमक खेळ सुरु केला. तिनं अखेरच्या मिनिटात 9 गुण घेत 10-8 अशी आघाडी मिळवली आणि निशा दहिया पराभूत झाली.
अखेरच्या मिनिटाला पराभव झाल्यानंतर निशा दहियाच्या अश्रूंचा बांध फुटला. ती रडत रडत मॅटवरुन बाहेर पडली. निशा दहियानं फायनल 16 मध्ये यूक्रेनच्या तेतियाना सोवा हिचा पराभव केला. निशा दहियानं तिचा 6-4 असा पराभव केला. निशा दहियानं तेतियानाकडून पिछाडीवर होती. त्यानंतर तिनं 4-4 अशी बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा तिनं आघाडी घेत विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या :