Paris Olympics 2024 Imane Khelif Gender: अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने (Imane Khelif) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात चीनच्या यांग लिऊचा पराभव करून ही कामगिरी केली. या विजयासह इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान इमाने खलीफवरुन गेल्या दिवासांपासून वाद रंगला होता.






इमाने खलीफवरुन वाद-


इमाने खलीफ आणि तैवानच्या लिन यू-टिंग या दोघांनाही लिंग चाचणीत अपयशी ठरल्याने गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. सुवर्णपदकाच्या लढतीतही टिंग पोहोचली आहे, असे असतानाही आयओसीने इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली. इमान खलीफने तिच्या पहिल्याच सामन्यात इटलीच्या अँजेला कारिनीचा पराभव केल्याने पुन्हा वाद सुरू झाला. इमाने खलीफविरुद्धच्या सामन्यात कॅरिनीने 46 सेकंदानंतर सामना सोडण्याचा निर्णय घेतला.


विजयावर काय म्हणाली इमाने खलीफ?


विजयानंतर इमाने खलीफ म्हणाली, मी खूप आनंदी आहे. हे माझे आठ वर्षांपासूनचे स्वप्न होते आणि आता मी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि सुवर्णपदक विजेती आहे. इमाने खलीफच्या विजयानंतर संघाच्या एका सदस्याने तिला आपल्या खांद्यावर उचलले आणि अल्जेरियन प्रेक्षकांनी 15,000 क्षमतेच्या कोर्ट फिलिप चॅटियर स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. गर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना इमाने खलीफ म्हणाली की, मला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व लोकांचे मला आभार मानायचे आहेत.


5-0 ने एकतर्फी विजय-


उंच असणाऱ्या इमाने खलीफने संपूर्ण स्पर्धेत तिच्या ताकदीचा वापर केला. अंतिम सामन्यात इमाने खलीफने माजी विश्वविजेत्या यांग लिऊविरुद्ध चमकदार कामगिरी केली. इमाने खलीफने रिंगच्या मधूनच अनेक दमदार पंच केले. या सामन्यात त्यांनी 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. यापूर्वी देखील इमान खलीफने सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला होता.


नेमकं प्रकरण काय?


इमाने खलीफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉक्सिंगच्या झालेल्या या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे. कारण गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे.


संबंधित बातमी:


हिंमतीने लढली, 46 सेकंदात हरली! महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ