Aman Sehrawat Paris Olympics 2024: भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात प्युटर्टो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझ याला 13-5 अशा फरकाने पराभूत करताना कांस्यपदक जिंकले. अमनने कांस्यपदक उंचावत अखेर कुस्तीतील पदकाची परंपरा कायम राखली. 


अमन सेहरावत भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अमन सेहरावत ऑलिम्पिक पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एक रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली आहेत. 2024 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय दलात सामील झालेला अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता आणि त्याने ऑलिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.




वयाच्या 11 व्या वर्षी आई-वडील गमावले-


अमनने अवघ्या 11 वर्षांचा असताना त्याचे आई-वडील गमावले. यानंतर त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. आई-वडील गमावूनही अमनने खेळाच्या मैदानाला आपले नवीन घर बनवले आणि त्यामुळेच वयाच्या 21व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. अमनच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे काका त्याला छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले, तिथून त्याची कहाणी सुरू झाली. अमनचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बिरोहर गावात झाला.


पालकांना समर्पित केलं पदक-


पदक जिंकल्यानंतर अमन सेहरावतने आपला ऐतिहासिक विजय त्याच्या पालकांना समर्पित केला आहे. तो म्हणाला की, आपला विजय त्याच्या पालकांना आणि संपूर्ण देशवासीयांना समर्पित आहे. अमन केवळ 21 वर्षांचा आहे आणि त्याच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे ही त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि सर्व देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन-


अमनने कांस्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अभिनंदन केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि दृढनिश्चय स्पष्टपणे दिसून येते. संपूर्ण देश या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 


अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या


तत्पूर्वी, अमन सेहरावतला उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित रेई हिगुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाने त्याचे सुवर्ण पटकवण्याचे स्वप्न भंगले होते. हरियाणाच्या अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती  जिंकल्या होत्या. शिवाय, त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 ने पराभव केला होता. यानंतर त्याने क्वार्टर फाइनलमध्ये अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव केला होता. 


संबंधित बातमी:


पैलवान अमन सेहरावतने बाजी मारली, ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं