Paris Olympics 2024 Imane Khelif Gender: सध्या जगभरात पॅरिस ऑलिम्पिकची (Paris Olympics 2024) चर्चा सुरु आहे. विविध देशातील खेळाडू उत्तम कामगिरी करत विविध पदके जिंकत आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या बॉक्सिंगच्या सामन्यावरुन वाद निर्माण झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आता एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. 


बॉक्सिंगमध्ये इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमाने खलीफ या 66 किलो वजन गटामध्ये आमने-सामने होत्या. मात्र या सामन्यात अवघ्या 46 सेकंदात एका स्पर्धकाने सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर अँजेला कॅरिनीने दावा केला त्यातून सध्या जगभरात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी इमाने खलीफची लिंग चाचणी फेल ठरल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं. असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. 






पराभूत झालेली अँजेला कॅरिनी काय म्हणाली?


मी लढण्यासाठीच रिंगणामध्ये उतरले होते. समोर कोण आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. जे घडलं ते योग्य होतं की नाही हे ठरवण्याचा मला अधिकार नाही. मी फक्त माझं काम केलं.  मला इमेन खलिफने इतक्या जोरात पंच मारला, जो माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कुणीच मारलेला नव्हता. तो पंच इतका जोरदार होता की माझ्या हनुवटीवर आघात झाला आणि काही क्षणातच मी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मी नेहमीच माझ्या देशाचा सन्मान केला आहे. यावेळी मी यशस्वी झाली नाही, कारण मी यापुढे लढू शकत नाही. माझ्या नाकात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली, असं अँजेला कॅरिनी म्हणाली.


नेमकं प्रकरण काय?


इमेन खलिफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉक्सिंगच्या झालेल्या या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे. कारण गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे.


संबंधित बातमी:


धोनीचा फॅन, जसा तो मैदानात कूल होता, तसाच मी सुद्धा शांत राहून कार्यक्रम केला, कोल्हापूरच्या स्वप्नीलची पहिली प्रतिक्रिया