अहमदनगर : अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि आशिया खंडातील अव्वल रोईंगपट्टू दत्तू भोकनळला रोईंग फेडरेशन आॕफ इंडीयाच्या चुकीच्या धोरणामुळे टोकिओ ऑलिम्पिकला मुकावे लागले. त्याचे काय चुकले हे सांगण्याची तसदी देखील रोईंग फेडरेशनने घेतली नाही. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात किसान क्रांती संघटना तसेच विविध शेतकरी संघटनेने या अन्यायास वाचा फोडण्यासाठी भोकनळ यास पाठिंबा दर्शवला आहे.


भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळला मोठा दिलासा, पत्नीनं दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 


 ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव पुणतांबा येथे दत्तू भोकनळनं काल भेट दिली. यावेळी पुणतांबा गावातील बळीराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पत्रकार परिषद घेण्यात आली.  किसान क्रांतीचे समन्वयक धनंजय जाधव आणि धनंजय धनवटे यांनी म्हटलं की, रोईंगपट्टू दत्तू भोकनळ सारख्या गुणवंत खेळाडूला रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया कारण न देता बाहेर काढले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यात लक्ष घालून शेतकरी पुत्राला न्याय द्यावा अशी मागणी किसान क्रांतीने केलीय.


यावेळी दत्तू भोकनळ म्हणाला की,  मला कॅम्पमधून बाहेर काढले. मात्र वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही मला कारण सांगितले जात नाही. रोईंग फेडरेशन माझी बदनामी करत आहे. किती दिवस फेडरेशनचा अन्याय सहन करायचा? महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशन किती दिवस माना खाली घालणार? असा उदिग्न सवाल दत्तू भोकनळनं उपस्थित केला. शेतकरी बांधवांनी दर्शवलेल्या पाठिंब्याबद्दल त्याने किसान क्रांतीचे आभार मानत पुन्हा कठोर मेहनत घेऊन देशासाठी सुवर्णपदक आणेल असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.  


दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा

भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला होता. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तूनं दाखल केलेली याचिका स्विकारत हायकोर्टानं नाशिक पोलिसांना हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले होते. दत्तू भोकनळच्या पत्नीनं त्याच्याविरोधात आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दत्तूनं महिलेसोबत आपले संबंध आणि वैदिक पद्धतीनं केलेला विवाह मान्य केला आहे. तसेच त्यानं किंवा त्याच्या कुटुंबियांनी हुंडा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी छळ केल्याचं कुठेच सिद्ध होत नाही. असा निर्वाळा देत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दत्तूच्या बाजूनं निकाली काढली होती. भारतीय सेनादलात कार्यरत असलेला दत्तू भोकनळ हा साल 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय रोईंगपटू ठरला होता. त्यानंतर त्यानं साल 2018 च्या आशियाई खेळांत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.