मुंबई : भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तूनं दाखल केलेली याचिका स्विकारत हायकोर्टानं नाशिक पोलिसांना हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
दत्तू भोकनळच्या पत्नीनं त्याच्याविरोधात आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दत्तूनं महिलेसोबत आपले संबंध आणि वैदिक पद्धतीनं केलेला विवाह मान्य केला आहे. तसेच त्यानं किंवा त्याच्या कुटुंबियांनी हुंडा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी छळ केल्याचं कुठेच सिद्ध होत नाही. असा निर्वाळा देत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दत्तूच्या बाजूनं निकाली काढली. त्यामुळे ऑगस्टमध्ये ऑस्ट्रियात होणाऱ्या रोईंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचा दत्तू भोकनळचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारताचा आघाडीचा ऑलिम्पियन आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेता दत्तू भोकनळ विरूद्ध त्याच्या पत्नीनं नाशिक पोलिसांत तक्रार दिली होती. '22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2018 या काळात आपल्या पतीनं आपला प्रचंड मानसिक आणि शारिरिक छळ केला आहे. दत्तू भोकनाळनं आपल्यासोबत हिंदू वैदिक पद्धतीनं विवाह केला. त्यानंतर रितसर लग्नाचं दोनवेळा आश्वासनही दिलं', असं या तक्रारीत नाशिक ग्रामीण पोलीस दलात असलेल्या त्याच्या पत्नीनं म्हटलं आहे. ही तक्रार खोटी असल्याचा दावा करत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तू भोकनळनं वैभव गायकवाड आणि रविराज परमाने यांच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
भारतीय सेनादलात कार्यरत असलेला दत्तू भोकनळ हा साल 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय रोईंगपटू ठरला होता. त्यानंतर त्यानं साल 2018 च्या आशियाई खेळांत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.