मुंबई/रांची: भारताविरुद्धच्या रांची कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची वेगवान तोफ अर्थात मिचेल स्टार्क दुखापतीमुळे उर्वरीत कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.


स्टार्कच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी स्कॅनिंग केली असता, फ्रॅक्चर आढळून आल्याने, स्टार्क मायदेशी परतणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीला 16 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

"स्टार्कच्या उजव्या पायाच्या दुखापतीने बंगळुरु कसोटीतच उचल खाल्ली होती. मात्र ही दुखापत बरी होईल अशी आशा होती. पण आज सकाळी स्कॅनिंग केली असता, फ्रॅक्चर आढळलं. त्यामुळे आता स्टार्कला विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नाही", असं संघाचे फिजिओथेरपिस्ट डेव्हिड बेकली यांनी सांगितलं.

या दुखापतीमुळे स्टार्क मायदेशी रवाना होणार आहे.

दरम्यान, स्टार्कच्या जागी कुणाला संधी मिळणार हे अद्याप ऑस्ट्रेलियन संघाने जाहीर केलेलं नाही. मात्र अतिरिक्त खेळाडू म्हणून दौऱ्यावर असलेल्या जॅक्सन बर्डला संधी मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अष्टपैलू मिचेल मार्शलाही दुखापतीमुळे उर्वरित कसोटीतून माघारी घ्यावी लागली आहे. त्यानंतर आता स्टार्कचाही नंबर लागला आहे.

मिचेल स्टार्कने या कसोटीत मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजीत तर भारतीय फलंदाजांना धडकी भरवली होती. याशिवाय पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाला गरज असताना अर्धशतक झळकावून, विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

पुणे कसोटीत स्टार्कने पहिल्या डावात 61, तर दुसऱ्या डावात 31 धावा केल्या होत्या. तर त्याने दोन विकेट्सही घेतल्या होत्या.

याशिवाय बंगळुरु कसोटीत स्टार्कने  3 विकेट घेतल्या होत्या. मात्र आता स्टार्कची गैरहजेरी ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच जाणवेल हे नक्की!