त्यादिवशी व्हॉट्सअपवर एक पोस्ट आली, ती वाचली तेव्हा अजिबात संदर्भ लागत नव्हता, मग थोडी गूगल बाबाची मदत घेतली आणि मनाताले मळभ दूर झाले, अगदी साक्षात्कार व्हावा तसे.
ती पोस्ट होती एका कलंदराची, जो अजरामर आहे, जो अव्याहत आहे, जो फकीर आहे पण तितकाच प्रेमाने श्रीमंत आहे, तो नाचण्यात आहे, तो गाण्यात आहे, तो "धमाल" मध्ये देखिल आहे, तो लाल आहे आणि तोच झूलेलाल पण आहे.
हो लाल मेरी पत रखियो बला झूले लालण,
सिंदडी दा सेवण दा
सखी शाह बाज कलन्दर
दमादम मस्त कलन्दर।
हाच तो कलंदर. जो आपण अगदी बोबडे शब्द बोलण्याच्या वयापासून आपल्या ओठांवर झुलतोय. पण नेमका हा झूलेलाल कोणता? कुठचा? कधीचा? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केलाच नाही. मी देखील नाही. पण एक ब्लास्ट काय झाला आणि सर्वांनाच झूलेलाल पुन्हा स्वतःच्या दरबारी घेऊन गेला.
ईसिसच्या एका माथेफिरुने ऐन "धमाल" रंगत असताना इथे बॉम्ब फोडला म्हणे, का तर ही शिया लोकांची जागा आहे. अरे पण, कलंदर बाबा कधी एका पंथात, धर्मात, देशात अडकून राहिला का? त्याच्या दरबारी सर्व जाती, पंथ, धर्म, स्त्री पुरुष एक होऊन जातात. मग तुम्ही नक्की कोणाला मारलात?
हा कलंदर बाबा कोणे एके काळी पाकिस्तानात आला, ते देखील इरान मधून, अगदी सिंधुच्या किनारी सेहवानमध्ये तो स्थिरावला, आणि त्याच्या विचारांनी, गाण्यानी तो इथलाच झाला. 1177 ते 1275 अशा तब्बल 98 वर्षे तो जगला. या 98 वर्षात तो पुढच्या अनेक शताकांचे कार्य करून गेला. त्याच्या मृत्यूनंतर 13 व्या शतकात त्याचा दर्गा बांधला गेला. जो आजपर्यंत अढळपणे उभा आहे. या कलंदराचे नाव, लाल शाहबाज कलंदर.
खरं नाव सय्यद मुहम्मद उस्मान करवंदी. पण तो लाल कपडे घलायचा म्हणून त्याला लोक लाल कलंदर म्हणू लागले. कोणी झूलेलाल म्हणू लागले. कोणी पीर म्हणू लागले तर कोणी फकीर म्हणू लागले. सेहवानला सिंधू किनारी राहणारा एक संत म्हणून देखील लोक त्याला ओळखू लागले. तो कवी, गायक, संगीतकार आणि लेखक होता. महान सूफी कवी अमीर खुसरोने त्यावर एक गाणे लिहिले, नंतर कवी बुल्ले शाह यांनी त्यात थोडे बदल केले. पण त्या गाण्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. सिंधुच्या प्रवाहाप्रमाणे, आणि सिंधुच्या काठाकाठावर ते गाणे वाहत गेले, लोकांच्या मनात भिडत गेले, ओठांवर कब्जा करू लागले, आजही तेच गाणे ओठांवर रेंगाळते आहे, दमादम मस्त कलंदर... अली दम दम दे अंदर...
बाबा कलंदर प्रत्येक धर्माचा होता. आणि मुस्लीम धर्मानेही त्याला कधीच आपल्या धर्माच्या दर्ग्यात कैद करुन ठेवले नाही. सिंधुच्या पाण्याप्रमाणे त्याला वाहु दिले, अखंड, अविरत. प्रत्येक धर्मात, पंथात तो एकरूप झाला, दुधात साखर एकरूप होते तशी. अरबी, पश्तू, फारसी, तुर्की, सिंधी आणि अगदी संस्कृत देखील त्याला यायची.
बाबा कलंदरने एका नवीनच प्रथेला जन्म घातला, ती म्हणजे " धमाल". ही धमाल साधीसुधी नाहीये. संध्याकाळ होत आली की सेहवान शरीफमध्ये ती बघायला नाही तर अनुभवता येते. सोमरसासारखी तिकडे असलेल्या प्रत्येकाच्या मनात धिंगाणा घालते. भिनत जाते, चढत जाते, अंतर्बाह्य समरूप करते. मग काशाचीही परवा फिकिर न करता तिथे असलेला प्रत्येक जण नशेमध्ये डुंबत जातो, नाचू लागतो, गाऊ लागतो, नौबतिच्या तालावर पाय चालावतो, दुःख विसरुन झूलेलालकडे पोहचतो. स्त्री,पुरुष, गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लीम, उच्च-नीच, कसल्याच भिंती त्याला अडवू शकत नाहीत. मग तो धमालमध्ये थिरकतो आणि काही क्षण का होईना, या शास्वत जगाची दारे सोडून पलीकडे निघून जातो. ही शक्ती आहे त्या धमालची.
अशा या एकसिन्धुत्वाच्या दर्ग्यात बॉम्ब स्फोट घडवून ईसिसला काय बरे साध्य करायचे असेल? तसेही एका बॉम्बने मरतो तो कलंदर कसला? दुसऱ्याच दिवसपासून त्याची नौबत पुन्हा सुरु झाली, लोक पुन्हा थिरकू लागले, ओ लाल मेरी करत गावू लागले. यातच ईसिसला खरा संदेश जातो.
अरे सिंधुच्या प्रत्येक थेंबात त्याचा लाल रंग असा मिसळला आहे की, त्याचा अंश देखील संपवनं कठीण आहे. हे ईसिसला देखिल कळून चुकले असेल.
त्या एका व्हॉट्सअप पोस्टने मला "कलंदरमय" केले. ती पोस्ट वाचली नसती आणि मनात जिज्ञासेची भूक नसती तर मला कलंदर कधीच कळाला नसता. यापुढे कलंदरची उपमा देखील देताना शेकडो वेळा विचार करेन. आता माझ्या मनाची स्थिती देखिल अशीच झाली आहे.
लाली मेरे लाल की, जित देखूँ तित लाल |
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ||
ब्लॉग : दमादम मस्त कलंदर
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
10 Mar 2017 10:15 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -