चेन्नई : गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवित सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. तब्बल 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने ४ वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला असून, हरियाणा संघाने दोन वेळा हा बहुमान मिळविलेला आहे. यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित 38 सुवर्ण, 21 रौप्य, 39 कांस्य अशी एकूण 98 पदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी 35 सुवर्ण, 22 रौप्य व 46 कांस्य अशी एकूण 103पदकांची कमाई केली.
महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक पदके
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 11 सुवर्ण, 10 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 27 पदके जिंकून पदक तालिकेमध्ये मोठा वाटा उचलला. त्या खालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदकांसह 17 पदके मिळाली, तर कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार सुवर्णपदकांसह 14 पदकांची कमाई झाली. अॅथलेटिक्समध्ये 12, तर वेटलिफ्टिंगमध्ये 13 पदके महाराष्ट्राने जिंकली. योगासनामध्ये महाराष्ट्राला 11 पदके मिळाली.
जलतरणामध्ये दोन्ही गटात सांघिक विजेतेपद
जलतरणामध्ये महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकाविले. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने यंदाच्या स्पर्धेतील ५० मीटर्स प्रीस्टाईल शर्यत २४.२२ सेकंदात पार केली आणि या स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठ त्याने महाराष्ट्राला रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या सुवर्णपदकांची संख्या पाच केली. तो नवी मुंबई येथील खेळाडू असून आजपर्यंत त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत व सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स प्रâीस्टाईल रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे ३५.५२ सेकंदात पूर्ण केली. मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकर हिने २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक जिंकताना दोन मिनिटे २६.९१ सेकंद वेळ नोंदवली. तिची सहकारी अलिफिया धनसुरा हिने ५० मीटर्स प्रâीस्टाईल शर्यत २७.०७ सेकंदात पार केली आणि सुवर्ण पदक जिंकले. हिबा चौगुले हिने ५० मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना ३४.९४ सेकंद वेळ नोंदविली.
आणखी वाचा :
IND vs ENG: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जेम्स अँडरसनचं कमबॅक, शोएब बशीरलाही संधी