MP List of North Maharashtra : लोकसभा निवडणूकांच्या तारखा (Lok Sabha Election 2024 Date) जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. निवडणूक आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात आपली सत्ता मिळवण्यासाठी देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात एकूण आठ मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभेत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपला 6, शिवसेना 2 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.
नाशिक लोकसभा मतदारसंघ
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. ही जागा शिवसेना लढवेल अशी सध्याची स्थिती आहे. उबाठाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर संभाव्य उमेदवार असू शकतात. तर गोकुळ पिंगळे यांचेही नाव चर्चेत आहे. ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवू शकतात. तर महायुतीतून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
दिंडोरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपल्याकडे घेणार असल्याचे समजते. ग्रामीण भाग असल्याने द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची येथे मोठी संख्या आहे. याचा फायदा शरद पवारांच्या उमेदवाराला होईल, मात्र अद्याप सक्षम उमेदवार सापडलेला नाही. भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा आणि धुळे जिल्हा मिळून धुळे लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याचा अंदाज आहे. काँग्रेसचे नाशिक जिल्हा प्रमुख तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. तर भाजपाकडून पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ
जळगाव लोकसभा निवडणुक कोणी लढवावी याबाबत महाविकास आघाडीत एकमत नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विकास पवार इच्छुकांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. तर या जागेसाठी ठाकरे गटदेखील प्रयत्नशील आहे. भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ
भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे या शरद पवार गटाकडून उमेदवार असतील, अशी शक्यता होती. पण एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे. तसेच रोहिणी खडसे यांनी विधानसभेची तयारी करत असल्याचे जाहीर केले आहे. आता शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ
शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव मतदरसंघ असून शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत या मतदारसंघात होत आलीय. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अद्यापही जागेचा तिढा सुटला नसून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब कांबळे सह बबनराव घोलप यांच नाव चर्चेत असून काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांसह महिला आयोग सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी तयारी सुरू केलीय.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या तुलनेत काँग्रेसची ताकद जास्त असून बाळासाहेब थोरात यांसह अजून एक काँग्रेसचा आमदार आहे तर शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार मतदारसंघात नाही. शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडून आल्यानंतर ठाकरे गटाला पाठिंबा दिलाय. याउलट महायुतीची ताकद वाढली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार, भाजपचे राधाकृष्ण विखे यांच्यासह पिचड, कोल्हे देखील महायुतीत आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार असेल असा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. नुकतीच निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील खासदारांची यादी (MP List of North Maharashtra)
मतदारसंघ | विजयी उमेदवार | पक्ष | सध्या कोणाच्या बाजूने |
नाशिक | हेमंत गोडसे | शिवसेना | शिंदे गट |
दिंडोरी | भारती पवार | भाजप | |
धुळे | सुभाष भामरे | भाजप | |
जळगाव | उन्मेष पाटील | भाजप | |
रावेर | रक्षा खडसे | भाजप | |
नंदुरबार | हिना गावित | भाजप | |
शिर्डी | सदाशिव लोखंडे | शिवसेना | शिंदे गट |
अहमदनगर | सुजय विखे पाटील | भाजप |
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Maharashtra Lok Sabha Election result 2019)
महाराष्ट्रात 2019 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
पक्ष | किती जागा |
भाजप | 23 |
शिवसेना | 18 |
राष्ट्रवादी | 4 |
काँग्रेस | 1 |
mim | 1 |
अपक्ष | 1 |
एकूण | 48 |
आणखी वाचा
MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?