मुंबई : टीम इंडियाच टी-20 संघाचा सलामीवीर लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम केएल राहुलने मोडीत काढला आहे. लाकेश राहुलने या मालिकेत सर्वाधिक 224 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 199 धावा केल्या होत्या.


लोकेश राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत एकूण 224 धावा केल्या. राहुलने पहिल्या सामन्यात 56, दुसऱ्या सामन्यात 57 धावा, तिसऱ्या सामन्यात 27 धावा, चौथ्या सामन्यात 39 धावा आणि शेवटच्या पाचव्या सामन्यात 45 धावा केल्या होत्या. राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर श्रेयस अय्यरने पाच सामन्यात 153 तर रोहित शर्माने चार सामन्यांत 141 धावा केल्या.


आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणार भारतीय खेळाडू


लोकेश राहुल - 224 धावा (न्यूझीलंड, 5 सामने)
विराट कोहली - 199 धावा (ऑस्ट्रेलिया, 3 सामने)
विराट कोहली - 183 धावा (वेस्टइंडीज, 3 सामने)
लोकेश राहुल - 164 (वेस्टइंडीज, 3सामने)
रोहित शर्मा - 162 (श्रीलंका, 3 सामने)


मालिका विजयानंतर बोलताना लोकेश राहुलने म्हटलं की, सिनियर ज्युनिअर असा फरक टीम इंडियामध्ये केला जात नाही. सर्व खेळाडू सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतात. न्यूझीलंडमध्ये 5-0 ने मालिका जिंकणे सोपं नाही. मोठ्या मेहनतीनंतर टीम इंडियाला हे यश मिळालं आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय खेळाडू मेहनत करत आहेत.


टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 5-0 अशी जिंकून न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. याआधी 2009 आणि 2019 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत यजमान संघानच वर्चस्व गाजवलं होतं. पण यावेळी विराटसेनेनं तो इतिहास पुसून नव्या विक्रमाची नोंद केली.


संबंधित बातम्या