ऑकलंड : लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरच्या निर्णायक भागीदारीमुळे टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात सात विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियासमोर 133 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान 15 चेंडू आणि सात विकेट्स राखून पार केलं. लोकेश राहुलनं 50 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 57 तर श्रेयसनं 33 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह 44 धावा उभारल्या. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. त्याआधी टीम इंडियाच्या प्रभावी अचूक माऱ्यासमोर न्यूझीलंडला पाच बाद 133 धावांचीच मजल मारता आली.


तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडचा संघ 132 धावाच करु शकला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुन्रो जोडीने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने गप्टीलला माघारी धाडलं. यानंतर काही काळाने कॉलिन मुन्रो देखील बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने डी-ग्रँडहोम आणि विल्यमसन यांना बाद करत कमबॅक केले. भारताकडून रविंद्र जाडेजाने 2 तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

INDvsNZ | टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा, लोकेश राहुल, श्रेयसची धडाकेबाज फलंदाजी 
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सगल दुसऱ्यांदा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर विराट 11 धावांवर बाद झाला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केला.