वेलिंग्टन :  गेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय साजरा केला आहे. तिसऱ्या टी 20  प्रमाणे या सामन्यात देखील रोमांच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात हिरो ठरले होते ते रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी. या सामन्यात हिरो ठरले ते लोकेश राहुल आणि शार्दूल ठाकूर.

सुपरओव्हरमध्ये यावेळीही कर्णधार विराट कोहलीने बुमराहवर विश्वास दाखवला. बुमराहने या ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर दोन, तर दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढणारा सेफर्ट चौथ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर आलेल्या मुन्रोने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव निघाली.

सुपरओव्हरमध्ये 14 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लोकेश राहुलने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत सामना टीम इंडियाच्या बाजूला झुकवला. मात्र तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने दोन चेंडू सहा धावा करत न्यूझीलंडवर सलग चौथा विजय मिळवला.

तिसऱ्या टी 20 सामन्यात अटीतटीच्या लढतील अखेर सामना टाय  झाला होता. शेवटी सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं थरारक विजय मिळवला होता. अशीच स्थिती काहीशी आजच्या चौथ्या सामन्यात देखील झाली आहे.  मात्र यावेळी मोहम्मद शमीची जागा घेतली ती मुंबईकर शार्दूल ठाकूरने. अखेरच्या षटकात  सात धावा विजयासाठी हव्या असताना न्यूझीलंडला केवळ सहा धावाच करता आल्या. यामुळे सलग दुसरा सामना टाय झाला आणि पुन्हा टीम इंडियानं विजय मिळवला.

वेलिंग्टनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाला आठ बाद 165 धावांत रोखलं होतं. या सामन्यात भारतानं रोहित शर्माला दिलेली विश्रांती न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची 6 बाद 88 अशी घसरगुंडी उडाली होती. पण मनीष पांडेनं झळकावलेल्या नाबाद अर्धशतकानं भारतीय डावाला आकार दिला. त्यानं 36 चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद 50 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलनं 39 आणि शार्दूल ठाकूरनं 20 धावांची खेळी केली.

विजयासाठी 166 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत पुन्हा पलटी खाल्ली.  नवदीप सैनीने 19 वं तर शार्दुल ठाकूरने 20 वं षटक भेदक मारा करत पुन्हा एकदा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. अर्धशतकवीर टीम सेफर्ट, रॉस टेलर यांना अखेरच्या षटकात माघारी धाडण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने 64 तर टीम सेफर्टने 57 धावा केल्या.

गेल्या सामन्यात देखील टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हॅमिल्टनच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर सनसनाटी मात केली होती. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मर्यादित 20 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना 179 धावा करता आल्या. त्यामुळे टाय झालेल्या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 18 धावांचं आव्हान रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पूर्ण करुन भारताला मालिकाही जिंकून दिली होती.