नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 16 खासदारांवर दिल्लीत अचानक बेघर होण्याची वेळ आली आहे. शासकीय निवासस्थान न मिळाल्याने हे 16 खासदार महाराष्ट्र सदनात राहत आहेत. 28 जानेवारीला लोकसभा सचिवालयाकडून अचानक पत्र आलं आणि महाराष्ट्र सदन पुढच्या दोन दिवसांमध्ये सोडा, अशा सूचना या खासदारांना करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपच्या खासदार भारती पवार, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेना खासदार हेमंत पाटील, भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी, ओमराजे निंबाळकर, रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र सदन न सोडल्यास तुमच्या खात्यातून रक्कम वसूल करु अशीही तंबी या खासदारांना देण्यात आली आहे. या सर्व खासदारांना वेस्टर्न कोर्टमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या वेस्टर्न कोर्टमध्ये खासदारांची सोय करण्यात आली आहे तिथे बऱ्याच सोयी-सुविधा नसल्याने खासदारांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शासकीय निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत खासदारांच्या राहण्याचा खर्च लोकसभा सचिवालयाकडून होत असतो. महाराष्ट्र सदनाचे सहा हजार रुपये दिवसाचे भाडे सचिवालय भरत होतं. पर्यायानं हे राज्य सरकारला मिळत होतं.
मात्र अचानक केंद्राच्या गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट होण्याचे आदेश या खासदारांना देण्यात आले आहेत. या निर्णयाने अनेक खासदारांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अनेकांनी आपली नाराजी आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली. अधिवेशन सुरू असतानाच असा आदेश आल्याने अनेकांची पळापळ झाली आहे. त्यानंतर सर्वपक्षीय खासदार आणि महाराष्ट्र सदनचे आयुक्त यांच्यात आता दुपारी बैठक होणार आहे.
मी स्वत: सर्व खासदारांना जाऊन भेटणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, अशी त्यांना विनंती करणार आहे. लोकसभा सचिवालयातही जाऊन याविषयी चर्चा करणार आहे. तसेच त्यांना झालेल्या त्रासाबद्दल खेदही व्यक्त करतो. मात्र खासदारांना याठिकाणाहून हलवण्याचं कारण अद्याप मला माहित नाही, असं महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय्य यांनी सांगितलं.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपच्या खासदार भारती पवार, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेना खासदार हेमंत पाटील, भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी, ओम राजे निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.