वसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. "अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का," असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. तसंच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवारी (2 फेब्रुवारी) एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं.

अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? : आशिष शेलार
शिवसेनेने बदललेले रंग एवढे आहेत की, सरड्यानेही आत्महत्या करावी. म्हणून सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं मत घ्या. माहित नसेल तर अभ्यास करा. नसेल करता येत तर माझ्यासारखे वकील खूप आहेत. पण हा कायदा लागूच करता येणार नाही, ही भूमिकाच मांडता येऊ शकत नाही.

विद्यार्थ्यांच्या माध्यामातून मोठा कट : आशिष शेलार
आशिष शेलार म्हणाले की, सीएए आणि एनआरसीविरोधात मुस्लीम समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी (नाव न घेता) एक युवा नेता गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात सहभागी झाला होता, त्यावेळी सरकारविरोधी तर ठीक आहे पण देशाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते त्याठिकाणी भेटून आंदोलनाला पाठिंबा देऊन गेले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण? गृहमंत्री कोणाचे? असे असतानाही राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठा कट रचला जात आहे. हा कट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजूबाजूला फिरत आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.



जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप
दरम्यान आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. आशिष शेलार यांना असं वक्तव्य करणं शोभत नाही, असं आव्हाड म्हणाले. "मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानणं आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही," अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

दिलगिरी व्यक्त करायला कमीपणा वाटत नाही : आशिष शेलार
"कोणाचाही अपमान करणे आमची संस्कृती नाही. कोणाला वाईट वाटत असेल तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करण्यास कमीपणा वाटत नाही. संविधानाबद्दल आम्हाला शिकवू नका. असंविधानिक भाषा वापरल्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायला काही वाटत नाही. मात्र संविधानिकरित्या बनवलेल्या कायद्याला विरोध करणे, संविधानिक आहे का?" असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं.