नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ""खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल." भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
हॉकीला सुवर्णकाळ देणारे मेजर ध्यानचंद
भारतीय हॉकीला सुवर्णकाळ देणारे खेळाडू म्हणून मेजर ध्यानचंद यांची ओळख. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. त्यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.
हिटलरची ऑफर नाकारली
ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1948 साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने 1928 ते 1964 दरम्यान झालेल्या 8 ऑलिम्पिक स्पर्धेपैकी 7 स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला 1936 मध्ये 8-1 ने नमावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
बालपण
ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1979 रोजी झाला.