मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत आज चर्चा झाली नाही. आजची भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्यानं कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. नाशिकमध्ये झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मी अहंकार मानणारा नेता नाही. कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणं ही परंपरा आहे. भेटीच्या आधी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की,  युती झाली नाही तरी मैत्री राहील.  


चंद्रकांत पाटील म्हणाले की,  राज ठाकरे  यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कुणी कुणाकडे जायचं हा मुद्दा नाही.”


चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका असं त्यांनी सांगितल्याने मी ते ऐकलं. ते ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर ती, युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसंदर्भातील राजकीय चर्चा झाली.


तसेच, दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. ज्या काळत मुंबईत मी विद्यार्थी दशेत होतो आणि अभाविपचं काम करायचो त्यावेळे ते भारतीय विद्यार्ती सेनेचं काम करायचे, तेव्हापासूनच माझ्या मनात नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं आहे, केवळ दिसण्यापुरतं नाही तर बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्दयांवर आग्रही राहणं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आलंच. परंतु त्यांनी मोठ्या भूमिकेतही यायला पाहिजे हे एक माणूस म्हणून त्यांना म्हणणं वेगळं, पण मी भाजपाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्या भूमिकेतून आज मनसे व भाजपा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.