Junior National Carrom Championship : इनडोअर खेळांमध्ये कॅरम हा सर्वात  (Carrom) प्रसिद्ध आणि अनेकांच्या आवडीचा खेळ असून आता या खेळाच्या स्पर्धाही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. नुकतीच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली स्काऊट हॉल, दादर येथे ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पार पडली.  47 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत ज्युनिअर गटात तामिळनाडूच्या खेळाडूंनी बाजी मारली. 18 वर्षाखालील जुनिअर गटात मुलांच्या एकेरीत अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने त्याच्याच सहकारी अब्दुर रहिमचा (तामिळनाडू ) पहिला सेट 11-17 असा हरल्यानंतरही दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये 14-10, 14-6 असा जिंकून विजेतेपद मिळविलं. तर 18 वर्षाखालील ज्युनिअर गटात मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने बिहारच्या शालू कुमारीला 20-5, 12-11 च्या फरकाने मात देत अजिंक्यपदावर आपले नाव कोरलं. 


दुसरीकडे 21 वर्षांखालील मुलांच्या युथ एकेरी गटात अंतिम सामन्यात विदर्भच्या गुरुचरण तांबेने महाराष्ट्राच्या दुष्यन्त गुप्ताला  21-5, 19-10 असं पराभूत करून बाजी मारली. तर 21 वर्षंखालील मुलींमध्ये युथ एकेरी गटात अंतिम फेरीत एअरपोर्ट अथॉरिटीच्या मंथाशा ईक्बालने कर्नाटकच्या एस. शायनीला 13-7,13-10 अशी मात देत अंतिम विजेतेपद पटकाविलं.  विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांकडून चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.


सांघिक गटात महाराष्ट्राची बाजी


18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) मुलांच्या संघाने विदर्भाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्राच्या मिहीर शेखने विदर्भच्या सुरज गायकवाडवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 17-5, 6-21 आणि 17-11 असा चुरशीचा विजय मिळवला. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या कौस्तुभ जागुष्ठेने विदर्भच्या ए. आय. यासिनला 21-5, 1-18 आणि 16-14 अशी मात दिली. दुहेरी लढतीत  महाराष्ट्राच्या अथर्व पाटील / एस. आर. रफिक जोडीने विदर्भच्या जी. समुद्रे / एस. रेहान जोडीला 18-2, 25-0 अशा फरकाने नमवत महाराष्ट्राच्या संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला.  


मुलींमध्ये महाराष्ट्र अंतिम लढतीत पराभूत


मुलींच्या सांघिक गटात बलाढ्य तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्रवर 3-0 असा (Maharashtra vs Telagana) विजय नोंदवून अंतिम विजेतेपद मिळविलं. तामिळनाडूच्या एच. आविष्काराने महाराष्ट्राच्या दीक्षा चव्हाणवर 18-3, 21-1 असा विजय नोंदवला. तर तामिळनाडूच्या एम. खझिमाने महाराष्ट्राच्या केशर निर्गुंवर 13-11, 21-0 अशी मात केली. दुहेरी लढतीत तामिळनाडूच्या वि मित्रा / सुपर्णा जोडीने महाराष्ट्राच्या श्रुती वेळेकर / ज्ञानेश्वरी इंगुळकरवर 24-0, 12-14  आणि 21-7 असा विजय मिळवून बाजी मारली. 


हे देखील वाचा-