मुंबई : टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने शनिवारी (04 जानेवारी)सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. मात्र प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो, असे पठाणने यावेळी म्हटले. परंतु निवृत्तीच्या निर्णयाबात इरफानने आज अजून एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.


इरफान म्हणाला की, लोक 27-28 वर्षांचे असताना करिअरची सुरुवात करतात. परंतु त्या वयात माझं करिअर संपलं. इरफानने त्याच्या वयाच्या 19 व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळवलं होतं. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात इरफानने पाहिला आतंरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना त्याने 2012 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळला होता. इरफानचं वय तेव्हा केवळ 27 वर्ष इतकं होतं.


इरफान आता 35 वर्षांचा आहे. 27 वर्षांचा होईपर्यंत इरफानने 301 आंतरराष्ट्रीय विकेट्स मिळवल्या होता. परंतु 2011 पासून त्याने त्याचा फॉर्म गमावला. त्यामुळे त्याला संघाबाहेर रहावे लागले. इरफान म्हणाला की, माझी अजून सामने खेळण्याची अजून विकेट्स मिळवण्याची इच्छा होती. मला वाटायचं की मीदेखील 500-600 विकेट्स मिळवाव्या. परंतु ते शक्य झालं नाही.


इरफान म्हणाला की, मला अधिक संधी मिळावी, अशी माझी इच्छा हवी होती, परंतु मला फारवेळा संधी मिळाली नाही. परंतु त्याबद्दल माझी कोणाबद्दल तक्रार नाही. परंतु आज मागे वळून पाहातो तेव्हा वाईट वाटतं. 2015 पर्यंत मी टीममध्ये कमबॅक करण्यासाठी धडपडत होतो. परंतु त्यानंतर मला वाटू लागले की, आता मी कमबॅक करु शकणार नाही. मी सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होतो, जेव्हा मी निवडसमितीमधील लोकांशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आले की, ते माझ्या गोलंदाजीबाबत समाधानी नव्हते.


इरफान पठाणने संपूर्ण कारकिर्दीत 120 वन डे, 24 कसोटी आणि 29 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आजवरच्या कारकीर्दीत पठाणच्या खात्यात 173 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 301 विकेट्स जमा आहेत. त्याने 29 कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स, 120 एकदिवसीय सामन्यांमध्ये 173 विकेट्स आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये 28 विकेट्स मिळवल्या आहेत.


फलंदाजीतही इरफानने सर्वसाधारण प्रदर्शन केलं आहे. 173 सामन्यांमध्ये 141 इंनिंग्समध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने 2821 धावा जमवल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2007 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयात इरफान पठाणनं मोलाचं योगदान दिलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या तीन भारतीयांमध्ये इरफान पठाणचा समावेश आहे.