मुंबई : जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला. आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला रिट्वीट करत सोनम कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.


आदित्य ठाकरे यांनी जेएनयूवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला. "विरोध करताना विद्यार्थ्यांना ज्या हिंसाचार आणि क्रूरतेचा सामना करावा लागला ते चिंताजनक आहे. जामिया विद्यापीठ असो किंवा जेएनयू. विद्यार्थ्यांवर क्रूरता झाली नाही पाहिजे. या गुंडांना कारवाईचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना वेळेवर आणि लवकरात लवकर न्याय मिळायला हवा", असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं.





आदित्य ठाकरे यांच्या या ट्वीटला अभिनेत्री सोनम कपूरने रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सोनम कपूरने उत्तर देतांना लिहिलं की, "आम्हाला अशाच नेत्यांची गरज आहे. आशेचा किरण अजून आहे." सोनम कपूरचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनमच्या ट्वीटवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.





जेएनयूच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी हैदोस घातला होता. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. सर्व हल्लेखोरांनी यावेळी तोंडाला रुमाल लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अनेक तक्रारी आल्या असून लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल करु, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


संबंधित बातम्या