Virat Kohli likely to lead RCB in IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस मेगा लिलाव होणार आहे. यावेळी अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसतील, तर अनेक संघांचे कर्णधारही बदलू शकतात.






त्यात आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधारही बदलू शकतो. मेगा लिलावाद्वारे राहुल आरसीबीच्या कॅम्पमध्ये जाईल आणि संघाचा पुढचा कर्णधार असेल, असे मानले जात होते. राहुलनेही आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आता विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनू शकतो, असे मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र, फाफ डू प्लेसिस अनेक वर्षांपासून आरसीबीचे कर्णधारपद भूषवत आहे.


विराट कोहली होणार आरसीबीचा कर्णधार?


ईएसपीएनच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे पुन्हा कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, या प्रकरणात किती तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही आणि आरसीबीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विराट कोहलीने दीर्घकाळ आयपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे. कोहली 9 वर्षे आरसीबीचा कर्णधार होता. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपद मिळविता आले नाही.


विराट कोहलीने 2021 मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर फाफ डु प्लेसिसला आरसीबीचा नवा कर्णधार बनवण्यात आले. फॅफ तीन वर्षांपासून आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी आरसीबी फॅफला सोडू शकते. त्यानंतर आरसीबीला नव्या कर्णधाराची गरज भासेल. अशा परिस्थितीत विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे.






जर आपण आयपीएलमधील विराटच्या कर्णधारपदाच्या विक्रमाबद्दल बोललो तर, त्याने 2013 च्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती. परंतु तो संघासाठी एकदाही विजेतेपद मिळवू शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली, फ्रँचायझीने 2016 मध्ये केवळ एकदाच फायनल खेळली होती, जेथे सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. कोहलीने एकूण 143 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी केवळ 66 सामन्यात संघ जिंकला आणि 70 सामन्यात पराभव झाला. शेवटच्या 3 हंगामांचा विचार करता, डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2024 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला होता.


हे ही वाचा -


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती; टीम इंडियाला मोठा दिलासा