Matthew Scott Wade: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील पाच कसोटी सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ही ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान मॅथ्यू वेडने 2021 च्या टी-20 विश्वचषकात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार टोलावत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत विजय मिळवून दिला होता.


मॅथ्यू वेडला गेल्या तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळत नव्हते. मॅथ्यू वेडने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळला होता. मॅथ्यू वेडला टी-20 मध्ये संधी मिळत होती. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलिया संघाचाही एक भाग होता. त्याने भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळला, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.


मॅथ्यू वेड देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार-


आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर मॅथ्यू वेड देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार आहे. याशिवाय मॅथ्यू वेड प्रशिक्षक म्हणूनही दिसणार आहे. पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत तो ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.


8 महिन्यांत दुसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा-


मार्चमध्ये शेफिल्ड शील्डचा अंतिम सामना खेळल्यानंतर मॅथ्यू वेडने याआधी प्रथम श्रेणी रेड बॉल फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तब्बल 8 महिन्यांनंतर मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.


मॅथ्यू वेडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-


मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियाकडून 36 कसोटी, 97 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या 63 डावांमध्ये त्याने 29.87 च्या सरासरीने 1613 धावा केल्या, ज्यात 4 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय वेडने एकदिवसीय सामन्यात 1867 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 26.13 च्या सरासरीने आणि 134.15 च्या स्ट्राईक रेटने 1202 धावा केल्या. मॅथ्यू वेडने एकदिवसीय सामन्यात 1 शतक आणि 11 अर्धशतकं आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत.


भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -


पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी


कोण मारणार बाजी?


बऱ्याच काळानंतर बॉर्डर-गावसकर मालिकेत 2024-25 मध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेअंतर्गत शेवटच्या वेळी 1991-92 मध्ये 5 कसोटी सामने खेळले गेले होते. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल.


संबंधित बातमी:


Rohit Sharma: 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा वानखेडेवर खेळणार शेवटचा कसोटी सामना?; लवकरच करणार मोठी घोषणा