Hardik Pandya's New Record:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आज (11 एप्रिल) हैदराबाद विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात हार्दिकनं षटकार मारून आयपीएलमधील षटकारांचं शतक पूर्ण केलंय. तसेच आयपीएलमध्ये सर्वात जलद षटकारांचं शतक करणारा हार्दिक पांड्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरला आहे. तर, क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणार तिसरा फलंदाज ठरला आहे.

हार्दिक पांड्यानं 96व्या आयपीएल सामन्याच्या 89व्या डावात षटकारांचे शतक पूर्ण केलंय. हार्दिक पांड्यानं हैदराबादविरुद्ध पहिला षटकार ठोकताच त्याच्या आयपीएलमधील षटकारांची संख्या दोनवरून तीन अंकी झाली. आयपीएलमध्ये 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो 26 वा खेळाडू ठरला आहे. परंतु, सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 षटकार मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानं अवघ्या 1046 चेंडूत हा पराक्रम केलाय. हार्दिक पांड्यापूर्वी भारताचा युवा फलंदाज आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं 1224 चेंडूत 100 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. हार्दिक आणि पंत यांच्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 1313 चेंडूत 100 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

आयपीएलमध्ये सर्वात जलद षटकारांचं शतक मारणाऱ्या फलंदाजांची यादी-

फलंदाजाचं नाव चेंडू
आंद्रे रसल 657
ख्रिस गेल 943
हार्दिक पांड्या 1046
कायरन पोलार्ड 1094
ग्लेन मॅक्सवेल 1118

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी तीन पैकी तीन सामने जिंकून आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज गुजरातचा संघ हैदराबाद विरुद्ध आपला चौथा सामना खेळतोय. आजच्या सामन्यात गुजरात कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

हे देखील वाचा-