Ravindra Jadeja, CSK vs MI : चेन्नई सुपरकिंग्स संघाचा हुकूमी एक्का रवींद्र जाडेजा बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर गेला आहे. जाडेजा आणि संघ व्यवस्थापनात काहीतरी वाद असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन रवींद्र जाडेजाला अनफॉलो करण्यात आल्याने आता आणखीच चर्चा होत आहेत. दरम्यान या सगळ्यात आता आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जाडेजाची महत्त्वाची कमी कोण भरुन काढणार? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. अशात काही दमदार पर्याय चेन्नईकडे आहेत, यावर एक नजर फिरवू...


मागील सामन्यात दुबेला मिळाली होती जागा


चेन्नई सुपर किंग्स संघाने खेळलेल्या शेवटच्या सामन्यात जाडेजा नव्हता. यावेळी संघात युवा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला संधी देण्यात आली. गोलंदाजीत खास कामगिरी केली नसली तरी फलंदाजीत दुबे चेन्नईसाठी चांगला ठरला आहे. त्याने यंदाच्या हंगामात 9 सामने खेळले. या सामन्यांमध्ये शिवमने 160.34 च्या स्ट्राईक रेटने 279 रन ठोकले आहेत. त्याने नाबाद 95 धावाही एका सामन्यात ठोकल्या आहेत. दरम्यान यामुळेच दुबेला आजही संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता असून तो जाडेजाला एक उत्तम पर्याय आहे. 


मिचेल सँटनरचाही पर्याय 


न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू आणि शेवटच्या फळीतील दमदार फलंदाज मिचेल सँटनरही चेन्नई संघात आहे. फलंदाजी तसंच गोलंदाजीत कमाल कामगिरी करणारा सँटनर क्षेत्ररक्षणातही तरबेज आहे. त्यामुळे जाडेजाच्या अनुपस्थितीत तो एक उत्तम पर्याय नक्कीच ठरु शकतो. याशिवाय मोईन अली हा संघात आहेच, त्यामुळे जाडेजाच्या अनुपस्थितीतही चेन्नई एक दमदार संघ आहे.


बंगळुरूविरुद्ध सामन्यात रवींद्र जाडेजाला दुखापत


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाली. एवढेच नव्हेतर दुखापतीमुळं त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागू शकते, अशी बातम्यांनी वेग धरला होता. त्यानंतर आता अधिकृतपणे चेन्नई सुपरकिंग्सनेही याबाबत माहिती दिली आहे.


हे देखील वाचा-