Rinku Singh Sixes in IPL 2023 : क्रिकेटच्या मैदानात कधीही काहीही होऊ शकतं. हेच दाखवलंय कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) अविश्वसनीय फलंदाज रिंकू सिंहने (Rinku Singh). केवळ 6 चेंडूत 29 धावांची गरज असताना सलग 5 षटकार (Rinku Singh Sixes) ठोकून रिंकू सिंगने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवली. या अविश्वसनीय घटनेमुळे आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानात तितकंसं चर्चेत नसलेलं रिंकूचं नाव, आज जगभरात पोहोचलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेला हा थरारक सामना, रिंकूने एकहाती फिरवला.
6 चेंडूत 29 धावांची गरज असताना, गुजरातचा स्टॅण्डिंग कर्णधार राशीद खानने (Rashid Khan) ती ओव्हर यश दयालला (Yash Dayal) सोपवली. उमेश यादवने (Umesh Yadav) 1 रन काढून रिंकूला स्ट्राईक दिला. त्यामुळे कोलकात्याला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 5 चेंडूत 28 धावांची गरज होती. मग रिंकूने यश दयालला कव्हरवरुन सिक्सर लगावला. त्यानंतर पुढच्या सर्व चेंडूंवर रिंकूने षटकार ठोकले. त्यामुळे गुजरातचं 205 धावांचं आव्हान कोलकात्याने 7 विकेट्सच्या मोबदल्यात थरारकरित्या पार केलं.
जितकी थरारक खेळी, तितकीच थरारक कहाणी
रिंकू सिंहने ज्याप्रकारे थरारक खेळी करुन, गुजरातचा विजय जबड्यातून खेचून आणला, त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्याची कहाणीही तितकीच थरारक आहे.
रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या अलिगढचा. तिथेच त्याचं कुटुंब राहतं. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. 5 भावंडांमध्ये रिंकू हे तिसरं अपत्य. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे. तिकडे रिंकूला शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची तुफान आवड होती. ज्यावेळी टीव्हीवर मॅच लागलेली असायची, त्यावेळी रिंकू टीव्हीसमोरुन हटत नव्हता. क्रिकेटवर त्याचं केवळ प्रेम नव्हतं तर क्रिकेट हे त्याचं वेड होतं. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळतो. तेव्हापासून 'धुलाई' हे त्याचं नियमित काम आहे. समोर कोणताही बोलर असो, त्याने फेकलेला यॉर्कर असो वा बाऊन्सर, त्याला सीमापार पोहोचवण्यासाठी रिंकू प्रसिद्ध होता. तेच त्याने कालच्या गुजरातविरुद्धच्या मॅचमध्येही दाखवून दिलं.
क्रिकेटला वडिलांचा विरोध
जसं आपल्याकडे टेनिस बॉल किंवा प्लास्टिक बॉलने क्रिकेट खेळणाऱ्यांना कधी ना कधी घरच्यांकडून धपाटे पडतात, तसंच रिंकूनेही क्रिकेटच्या वेडापाई घरच्यांचा अनेकवेळा मार खाल्लाय. रिंकू सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याचे वडील भलतेच चिडायचे. रिंकूने याबाबत म्हटलंय, "मी क्रिकेट खेळू नये असं माझ्या वडिलांना वाटायचं. क्रिकेटमध्ये माझा वेळ बरबाद व्हावा अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. कधीकधी मला मारही खावा लागायचा. खेळून मी घरी आलो की घरी माझी धुलाई व्हायची. मला क्रिकेट खूप आवडायचं, त्यामुळे माझ्या भावांनी मला साथ दिली. मला त्यावेळी बॉल खरेदी करायलाही पैसे नसायचे, मग बॅटचं स्वप्न तर लांबची गोष्ट होती. मात्र काही लोकांनी त्यासाठी मला मदत केली"
दिल्लीत खेळवण्यात आलेल्या एका स्पर्धेत रिंकूला बक्षीस म्हणून बाईक मिळाली होती. ती बाईक त्याने वडिलांना दिली. त्यामुळे वडिलांना जरी आनंद झाला असला तरीही कुटुंबाची आर्थिक स्थिती जशीच्या तशी होती. त्यामुळे रिंकूने पूर्णपणे क्रिकेटकडे न वळता पोटापाण्यासाठी काही करावं अशीच त्यांची इच्छा होती.
कोचिंग सेंटरवर लादी पुसण्याची नोकरी
रिंकूचा संघर्ष केवळ बॅट आणि बॉल इतका मर्यादित नव्हता. रिंकूने आपल्या वयाच्या विविध टप्प्यांवर खूप संघर्ष केला आहे. त्याने एका कोचिंग सेंटरवर लादी (फरशी) पुसण्याचं कामही केलं आहे. त्याच्यासाठी ती नोकरी होती. "एका कोचिंग सेंटरवर मला लादी पुसण्याची नोकरी मिळाली होती. सकाळी-सकाळी जाऊन लादी पुसावी लागायची. माझ्या भावानेच मला ही नोकरी मिळवून दिली होती. मी ही नोकरी करु शकलो नाही. काही दिवसात ही नोकरी सोडून दिली. मी अभ्यासातही तितका हुशार नव्हतो. त्यामुळे क्रिकेट हेच माझं ध्येय होतं. मला क्रिकेटच पुढे घेऊन जाऊ शकतं हे मी मनोमन ठरवलं. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
शाहरुखच्या टीमकडून रिंकूवर बोली
रिंकूने क्रिकेटला मनोमन स्वीकारल्यानंतर, तो छोट्या मोठ्या स्पर्धा गाजवत सुटला. आता त्याला फक्त एका मोठ्या संधीची गरज होती. रिंकूला ही सिंधू किंग खान शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सने दिली. रिंकूला 2018 मध्ये KKR ने 80 लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. तेव्हापासून रिंकू कोलकाताचा सदस्य आहे.
रिंकूला घडवण्यात दोन व्यक्तींचा मोठा वाटा आहे. एक म्हणजे मोहम्मद जीशान आणि दुसरे मसूद अमीन. रिंकूला लहानपणापासून क्रिकेटचे धडे मसूद अमीन यांनी दिले. तर मोहम्मद जीशान यांनी रिंकूवर विश्वास ठेवून त्याला, अयशस्वी होऊनही अंडर 16 मध्ये संधी दिली.
रिंकूच्या मेहनतीला फळं येण्यास 2014 पासून सुरुवात झाली. त्याला उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाय ठेवले. त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू चमकत राहिला. IPL मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणजे सध्याच्या पंजाब किंग्जने 10 लाखात त्याला खरेदी केलं होतं. मात्र त्याला मैदानात उतरण्याची एकही संधी मिळाली नव्हती.
मागील वर्षीही धमाका
दरम्यान, गेल्या ५ वर्षापासून रिंकू कोलकात्याकडून मैदानात उतरतोय. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात 15 चेंडूत 40 धावा करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धगधगती कारकीर्द
रिंकू सिंहची फर्स्ट क्लास (प्रथम श्रेणी) क्रिकेटची कारकीर्द तितकीच धगधगती आहे. त्याने आतापर्यंत 40 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने सात शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. नाबाद 163 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 53 च्या सरासरीने 1749 धावा कुटल्या आहेत. तर टी 20 सामन्यात रिंकूने 6 अर्धशतकांच्या जोरावर 1392 धावा चोपल्या आहेत.
रिंकूचा हाच फॉर्म जर कायम राहिला, तर टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी त्याला कोणीही रोखू शकणार नाही हे निश्चित!
महत्त्वाच्या इतर बातम्या :