Blockbuster Weekend for Indian Batters in IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम सध्या सुरु आहे. आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 14 सामने खेळवण्यात आले आहेत. आगामी सामन्यांमध्ये या स्पर्धेला आणखी रंजक वळण लागणार आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक खेळाडूंची दमदार खेळी पाहायला मिळत आहे. विशेषत: हा विकेंड भारतीय खेळाडूंसाठी फारच चांगला ठरला आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी विकेंडच्या आयपीएल सामन्यांमध्ये कमाल खेळी केली आहे. यामध्ये शिखर धवन, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी याच्यासह सात खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय खेळाडूंचा आयपीएलमध्ये धमाका
आयपीएल 2023 मध्ये शनिवारी आणि रविवारी डबल हेडर सामने पार पडले. हा वीकेड भारतीय फलंदाजांनी चांगलाच गाजवला. रविवारी रात्री झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने नाबाद 99 धावांची धमाकेदार खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 60 धावा, अजिंक्य रहाणे 61, विजय शंकर 63* धावा, व्यंकटेश अय्यर 83 धावा, रिंकू सिंह 48* धावा आणि राहुल त्रिपाठी याने 74* धावांची दमदार खेळी केली.
या भारतीय खेळाडूंनी गाजवला वीकेंड
यशस्वी जैस्वाल - 60 (31).
अजिंक्य रहाणे - 61 (27).
विजय शंकर - 63* (24).
व्यंकटेश अय्यर - 83 (40).
रिंकू सिंग - 48* (21).
शिखर धवन - 99* (66).
राहुल त्रिपाठी - 74* (38).
शिखर धवनची नाबाद 99 धावांची खेळी
एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवनने अखेरपर्यंत शर्थीची झुंज दिली. धवनच्या नाबाद 99 धावांच्या खेळीमुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. शिखर धवन याने 66 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे.
रिंकू सिंहकडून सलग पाच षटकार, धावांचा पाऊस
कोलकाता आणि गुजरात टायटन्सवर अटीतटीच्या लढतीत कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला रिंकू सिंह (Rinku Singh). त्याने शेवटच्या षटकात दमदार खेळी केली आणि गुजरातच्या जबड्यातून सामना हिरावून घेतला. रिंकू सिंहने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत अक्षरक्ष: धावांचा पाऊस पाडला. 25 वर्षीय रिंकू सिंहने गुजरातच्या यश दयालच्या चेंडूवर हे पाच षटकार ठोकत धमाकेदार खेळी केली. त्याने 21 चेंडूत 48 धावा केल्या.
इम्पॅक्ट प्लेअर व्यंकटेश अय्यरची अर्धशतकी खेळी
गुजरात विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरची इम्पॅक्ट प्लेअर खेळाडू म्हणून निवड केली. या खेळाडूनंही संघाला निराश केलं नाही. व्यंकटेश अय्यरने 40 चेंडूत 83 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअरने अर्धशतकी खेळी केली.