Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर धोनी (MS. Dhoni) आणि कोहली (Virat Kohli) आमने-सामने येणार आहे. या रोमांचक सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची एकसारखीच कामगिरी पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. आरसीबी आणि चेन्नई दोन्ही संघांनी चार पैकी दोन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांकडे चार गुण आहेत. चेन्नई गुणतालिकेत सहाव्या तर बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे.
IPL 2023 CSK vs RCB : धोनी आणि कोहली आमने-सामने
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पडणार आहे. टीम इंडियाच्या दोन्ही माजी कर्णधारांमध्ये आज रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघ तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी संघ मैदानात उतरेल. धोनी विरुद्ध कोहली सामना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
RCB vs CSK IPL 2023 : आयपीएलमधील चेन्नई आणि बंगळुरु संघाची आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई संघाचं पार जड आहे. आयपीएलमध्ये बंगळुरू आणि चेन्नई या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने झाले आहेत. या 31 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने 20 सामने जिंकले आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ 10 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला होता. या आकडेवारीनुसार, चेन्नईचा संघ आरसीबीच्या खूप पुढे असल्याचं स्पष्ट होत आहे.
IPL 2023 CSK vs RCB : आजच्या सामन्याकडे सर्वाचं लक्ष
दरम्यान, चेन्नई आणि आरसीबीमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली होती. आरसीबी (RCB) आणि चेन्नई (CSK) यांच्यातील शेवटचा सामना 4 मे 2022 रोजी पुण्यात झाला होता. या सामन्यात बंगळुरूने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. गेल्या वर्षी चेन्नईचा संघ अतिशय खराब फॉर्ममधून जात होता. आयपीएल 2022 मध्ये, चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर होता, तर आरसीबीने दुसऱ्या क्वालिफायरपर्यंत प्रवास केला होता. या मोसमात आरसीबी आणि सीएसके या दोन्ही संघांचा फॉर्म जवळपास सारखाच आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :