KXIP vs MI LIVE Score IPL 2020 : कर्णधार रोहित शर्माचं शानदार अर्धशतक आणि पोलार्डच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाब वर 48 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने गुरुवारी येथील शेख जाएद स्टेडियममध्ये पंजाबला 192 धावांचे लक्ष्य दिलं होतं. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने निर्धारित 20 षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात 191 धावा उभारल्या. यात कर्णधार रोहितच्या 70 धावांचा समावेश आहे. रोहितने 45 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार लगावले.


मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारु शकला. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी 2-2 बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.


मुंबई प्रमाणेच पंजाबची सुरुवात देखली खराब झाली. मयंक अग्रवाल 25 धावा करुन माघारी परतला. पाठोपाठ करूण नायर शून्यावर बाद झाला. फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलची विकेट फिरकीपटू राहुल चहरने घेतली. केएल राहुलाही केवळ 17 धावाच जमवता आल्या. 3 गडी झटपट बाद झाल्यावर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी मोक्याच्या क्षणी चांगली भारीदारी केली. पूरनने 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 44 धावा केल्या. पण अखेर पंजाबला पराभवाला सामोरं जावं लागलं.


IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं; कोणता संघ, कोणत्या स्थानी?


तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सुरुवातीलाचं धक्का बसला. क्विंटन डी कॉक या सामन्यातही अपयशी ठरला. पहिल्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केलं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना इशान किशन झेलबाद झाला. त्याने 32 चेंडूत 28 धावा केल्या.


डावाच्या सुरूवातीला अतिशय संयमी खेळी करणाऱ्या रोहितने 40 चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. शर्मा 70 धावांवर बाद झाला. त्याने 48 चेंडूच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार खेचले. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या-पोलार्डने तुफान फटकेबाजी केली. पोलार्डने 20 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार मारत नाबाद 47 धावा केल्या. तर हार्दिकने 11 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 30 धावा जमवल्या.