RCB vs CSK Equation In Net Run Rate: आयपीएल 2024 च्या (IPL 2024) 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 47 धावांनी पराभव केला. आता बंगळुरुचा शेवटचा सामना शनिवारी, 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) खेळायचा आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचे असणार आहे. बंगळुरुचा या सामन्यात पराभव झाल्यास प्ले ऑफच्या फेरीत पोहचण्याची आशा संपुष्टात येईल.
आरसीबी सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनाही पात्र होण्याची संधी आहे. जर दिल्ली, लखनौ आणि गुजरातचे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आणि शर्यत फक्त चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील लढत असेल, तर आरसीबीला नेट रनरेट सुधारण्यासाठी चेन्नईविरुद्ध चांगला विजय नोंदवावा लागेल.जाणून घ्या, नेट रन रेटचे संपूर्ण समीकरण...
चेन्नईला हरवून बेंगळुरु प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो-
समजा प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने 200 धावा केल्या तर त्यांना चेन्नईचा 18 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. दुसरीकडे, जर समजा चेन्नईने प्रथम फलंदाजी करून बेंगळुरूला 201 धावांचे लक्ष्य दिले, तर नेट रनरेट सुधारण्यासाठी बंगळुरूला 11 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल. आता बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या साखळी सामन्यासाठी आमनेसामने असतील. चेन्नईचे 14 आणि बेंगळुरूचे 12 गुण आहेत.
बंगळुरुने शेवटचे पाच सामने मोठ्या फरकाने जिंकले
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. बेंगळुरूने हैदराबादवर 35 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 38 चेंडूत 4 गडी राखून विजय मिळवला. पंजाबविरुद्ध बेंगळुरूने 60 धावांनी विजय मिळवला होता आणि आता दिल्लीविरुद्ध बेंगळुरूने 47 धावांनी विजय मिळवला आहे.
बंगळुरूने नशीब पालटले-
बंगळुरुकडून विराट कोहली सुरुवातीपासून सतत धावा करत होता, पण आता आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे. गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करता येत नव्हता, पण आता गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बंगळुरुचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसून येत आहे. गोलंदाजीमुळे बंगळुरू मोठ्या फरकाने सामने जिंकत आहे.