IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2024 चा शेवटचा घरच्या मैदानावर हंगामातील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) खेळला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) मैदानावर उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचा निरोप घेतला. यादरम्यान धोनीने सुरेश रैनाला मिठी मारली. धोनी आणि रैना मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तसेच धोनीचा आयपीएलचा हा शेवटचा हंगाम असल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे. मात्र चेन्नई आणि एमएस धोनीने याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
धोनी आणि रैनाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सच्या संपूर्ण संघाने मैदानावर फेरफटका मारला. यादरम्यान सुरेश रैनाही तिथे पोहोचला. यानंतर रैना आणि धोनीने मिठी मारली. चेन्नईच्या दिग्गज खेळाडूंची मिठी चाहत्यांना खूप आवडली.
सामना कसा राहिला?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. रियान परागने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 35 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47* धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 18.2 षटकांत विजय मिळवला. चेन्नईसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 42* धावा केल्या. यादरम्यान गायकवाडने 1 चौकार आणि 2 षटकार मारले होते. चेन्नईचा कर्णधार सलामीला आला होता आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला.
चेन्नईचं प्ले ऑफच्या दिशेने पाऊल-
चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवून प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चेन्नई 14 गुणांसह आणि +0.528 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पराभूत राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा हा सलग तिसरा पराभव ठरला.