IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील मजेदार प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली स्फोटक शैलीत फलंदाजी करत होता. त्याने केवळ 13 चेंडूत 27 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 3 षटकारही लगावले. या सामन्यात इशांत शर्माने विराट कोहलीला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच बाद केले, त्यानंतर इशांत शर्माने विराट कोहलीला डिवचत जोरदार सेलिब्रेशन केले. विराट कोहली आणि इशांत शर्मा डोमेस्टिक क्रिकेटच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि अनेकदा विनोद करताना दिसतात.
इशांत शर्माचे मजेदार सेलिब्रेशन
ही घटना रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील चौथ्या षटकाची आहे. या षटकातील पहिला चेंडू कोहलीच्या बॅट लागून थर्ड मॅनच्या दिशेने चौकार गेला. यानंतर कोहली इशांतला काहीतरी बोलला आणि त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवर कोहलीने षटकार टोलावला. षटकार मारल्यानंतर कोहली पुन्हा एकदा इशांतकडे बोट दाखवताना दिसला. इशांतने ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकारासह 11 धावा दिल्या होत्या. इशांतने चौथा चेंडू फुल लेंथवर टाकला, त्यावर कोहलीने फ्रंटफूटवर येऊन चेंडू टोलावला, पण बॅट लागून तो यष्टीरक्षक अभिषेक पोरेलकडे गेला आणि कोहली बाद झाला. कोहलीचा हा डाव 27 धावांवर संपला. यानंतर विराट कोहलीची विकेट घेतल्यावर इशांत शर्मा त्याला चिडवण्यासाठी त्याच्या जवळ जाऊन धक्काबुक्कीही केल्याचे पाहायला मिळाले.
पाहा व्हिडीओ-
विराट कोहलीचे आयपीएलमध्ये 250 सामने पूर्ण
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात 250 सामने पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा कोहली जगातील केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एमएस धोनी (263), रोहित शर्मा (256) आणि दिनेश कार्तिक (255) यांनी आयपीएलच्या इतिहासात 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.