IPL 2024 MS Dhoni Record: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पंजाब किंग्जविरुद्ध शून्यावर बाद झाला असला तरी, या 42 वर्षीय अनुभवी खेळाडूने इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीने यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकाही यष्टीरक्षकाने 150 झेल घेतलेले नाहीत, मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधाराने वयाच्या 42 व्या वर्षी ही कामगिरी केली.
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त धोनी खेळाडू रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. आतापर्यंत आयपीएलच्या 261 सामन्यांमध्ये धोनीने यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेतले आहेत आणि 42 फलंदाजांना यष्टिचित केले आहे. अशाप्रकारे यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीने 192 फलंदाजांना बाद केले आहे. त्याचबरोबर या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत 245 आयपीएल सामन्यांमध्ये 141 झेल घेतले आहेत, तर 36 फलंदाजांना यष्टिचीत केले आहे.
महेंद्रसिंह धोनीने जितेश शर्माचा झेल घेत रचला इतिहास-
महेंद्रसिंह धोनीने पंजाब किंग्जविरुद्ध सिमरजीत सिंगच्या गोलंदाजीवर जितेश शर्माचा झेल घेत आपला 150 वा झेल पूर्ण केला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात सॅम कुरनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंगने 2-2 बळी घेतले. मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाल्या.
गुणतालिकेची काय स्थिती?
आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचा संघही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
MS धोनीने खेळू नये, चेन्नईने त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा; हरभजन सिंग संतापला