बंगळुरु : लखनौ सुपर जाएंटसचा (Lucknow Super Giants) वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) चर्चेत आला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) त्यानं सर्वाधिक वेगानं गोलंदाजी केली आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं सहा विकेट घेतल्या आहेत. आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं चार ओव्हरमध्ये 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. मयंक यादवनं कॅमेरुन ग्रीनची विकेट घेताना ताशी 156.7 किमी वेगानं बॉल टाकला होता. आयपीएलसह जगभरातील क्रिकेटर्सचं लक्ष मयंक यादवच्या बॉलिंगकडे गेलं आहे. मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीपुढं दिग्गज फलंदाज अडचणीत येत आहेत. या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननं सल्ला दिला आहे.
मयंक यादवच्या दमदार कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जाएंटसनं आरसीबीवर 28 धावांनी विजय मिळवला. पंजाब विरुद्ध त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडननं स्टार स्पोर्टस बोलताना मयंक यादवच्या गोलंदाजीवर भाष्य केलं आहे. मयंक यादवच्या बॉलिंगवर फलंदाजांनी कसं खेळावं याबाबत त्यांनी सल्ला दिला आहे.
मॅथ्यू हेडन म्हणाला की आयपीएलमध्ये जे घडत असतं त्यावर सर्वांच्या नजरा असतात. सर्व दिग्गज खेळाडू सर्व गोष्टी पाहत असतात. सध्या सर्वजण मयंक यादवच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा यासाठी रणनीती बनवत आहेत. तुम्ही जर बॉलच्या लेंथवर अवलंबून असाल तर त्याचा वेग जास्त असल्यानं शॉट मारण्यात अपयश येऊ शकतं. फलंदाजांनी मयंक यादवचा बॉल त्यांच्या पर्यंत येण्याची वाट पाहायला हवी, असं हेडन म्हणाले. मयंकच्या बॉलिंगवर फ्रंट फूट अथवा बॅकफूटवर जाण्याच्या प्रयत्न करु नका. तुम्ही फक्त दबावाचा सामना करा, त्यानंतर बॉल त्याचं काम करेल कारण त्याचा वेग जास्त आहे, असं हेडन म्हणाला.
मयंक यादवला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत संधी द्या
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथनं देखील मयंक यादवच्या बॉलिंगसंदर्भात भाष्य केलं आहे. मयंक यादवला आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत संधी देण्यात यावी असं त्यानं म्हटलं आहे. मयंक यादवनं आयपीएलमधील दोन मॅचमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. मयंक यादवनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मॅचमध्ये मयंकनं 3 विकेट घेतल्या. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये मयंक यादवनं 14 धावांमध्ये 3 विकेट घेत टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरुन ग्रीनची विकेट मयंक अग्रवालनं घेतली.
दरम्यान, लखनौ सुपर जाएंटसची टीम आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दोन विजय आणि एका मॅचमधील पराभवामुळं लखनौकडे चार गुण आहेत.
संबंधित बातम्या :
Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस...फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!