IPL 2024 Final Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना आज रंगणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हैदराबादने दुसरा क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. मागील हंगामात म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले नव्हते. कोलकाता आणि हैदराबादच्या या सामन्यापूर्वी चेपॉकमधून चाहत्यांसाठी न आवडणारे चित्र समोर आले आहे. काल संध्याकाळपासून चेन्नईत मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे केकेआरचे सराव सत्र रद्द करण्यात आले. तसेच पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेता कोण?
आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. यावेळी पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण झाला. त्याप्रमाणे या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना किमान 5 षटकांचा करण्याचा प्रयत्न केला जाईल. 5 षटकांचा सामना न खेळल्यास सुपर ओव्हरद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो. पावसामुळे सुपर ओव्हरचा खेळही न झाल्यास गुणतालिकेतील क्रमाच्या आधारे निर्णय घेतला जाईल.
क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाताने हैदराबादचा केला होता पराभव-
कोलकाता आणि हैदराबादचा संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडले होते, ज्यामध्ये केकेआरने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सचा पराभव केला. केकेआरने शेवटचा आयपीएल फायनल 2012 मध्ये चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये गंभीरने कर्णधार म्हणून विजेतेपद पटकावले होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने 2014 मध्ये पुन्हा विजेतेपद पटकावले आणि आता एक मार्गदर्शक म्हणून तो त्याच संघासाठी विजेतेपद मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचाही तो प्रबळ दावेदार असून आयपीएल विजेतेपदाने त्याचा दावा आणखी मजबूत होईल.
केकेआरची संभाव्य इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य इलेव्हन
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन.