IPL 2024 CSK vs RR: राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात काल झालेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारत 5 विकेट्सने हा सामना जिंकला. राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर रचिन रविंद्रने 27, डॅरिल मिचेलने 22, मोईन अलीने 10, शिवम दुबे 18, रवींद्र जडेजा 5 आणि समीर रिझवीने 15 धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नेंद्र बर्गरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. राजस्थानचा सलग तिसरा पराभव झाला आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर कायम असून प्ले ऑफमध्ये खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही...'
संजू सॅमसन म्हणाला की, तुम्ही प्ले ऑफबद्दल विचार करता हे अगदी सामान्य आहे, परंतु मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. तसेच आगामी सामन्यांमध्ये संघ अधिक चांगली कामगिरी करेल, असं संजू सॅमसनने सांगितले. तसेच पॉवरप्लेनंतर आम्ही 170 धावांपर्यंत मजल मारण्याची अपेक्षा करत होतो, परंतु तसे झाले नाही, असंही सॅमसन म्हणाला.
राजस्थान रॉयल्स प्ले ऑफ खेळण्याची खात्री आहे, पण...
सध्या राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे 12 सामन्यांत 16 गुण आहेत. वास्तविक, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने हंगामाची धमाकेदार सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सने पहिल्या 10 सामन्यांमध्ये 8 विजय नोंदवले, परंतु त्यानंतर विजयाची मालिका कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय राजस्थान रॉयल्स दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.
राजस्थानकडून रियान परागच्या सर्वाधिक धावा-
राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानने 5 विकेट्स गमावत 141 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. रियान परागने 35 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. यशस्वी जैस्वालने 24, जॉस बटलरने 21, संजू सॅमसनने 15 आणि ध्रुव जुरेलने 28 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीत सिंगने 3 विकेट्स पटकावल्या. तर तुषार देशपांडे 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.