Riley Meredith In Mumbai Indians : झाय रिचर्डसन याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्या जागी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 140 किमी प्रति तास वेगाने चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजाचे आगमन झालेय. होय... मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या रायली मेरेडिथ  (Riley Meredith) याच्यासोबत करार केला आहे. तो लवकरच मुंबईच्या संघासोबत जोडला जाणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात आठ एप्रिल रोजी होणार आहे, त्या सामन्यासाठी रायली मेरिडिथ उपलब्ध असेल. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. रायली मेरेडिथ जसप्रीत बुमराहची कमी भरुन काढणार का? 


मुंबई इंडियन्सने झाय रिचर्ड्सनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रायली मेरेडिथ याला ताफ्यात घेतले आहे. 1.5 कोटी रुपये मोजत या भेदक गोलंदाजाला मुंबईने साईन केलेय. रायली मेरिडेथ जोफ्रा आर्चरसोबत मुंबईच्या गोलंदाजी ताफ्यात असणार आहे. 


कोण आहे रायली मेरेडिथ ?


रायली मेरेडिथ (Riley Meredith) ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. 2022 मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. 2022 मध्ये मुंबईने रायली मेरिडिथ याला एक कोटी रुपयात खरेदी केले होते. 2022 च्या हंगामानंतर मुंबईने त्याला रिलिज केले होते.  रायली मेरेडिथ याचा जन्म 21 जून 1996 रोजी तस्मानियातील होबार्ट येथे झाला. मुंबई आधी रायली मेरेडिथ पंजाब संघाचा भाग होता. रायली मेरेडिथ याने 13 आयपीएल सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. रायली मेरिडिथ याने ऑस्ट्रेलियासाठी पाच टी 20 आंतरराष्ट्रीय आणि एका एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. यामध्ये त्याने आठ विकेट घेतल्या आहेत. रायली मेरेडिथ याची खास बाब म्हणजे, तो 140 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करतो. रायली मेरेडिथ याला आयपीएलमध्ये प्रभाव पाडता आलेला नाही. तो आयपीएल महागडा गोलंदाज ठरलाय. त्याने नऊच्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत. 






आठ एप्रिल रोजी मुंबई वानखेडे मैदानावर चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर चेन्नई विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी कसून सराव केला.


आणखी वाचा :


IPL 2023: 'थँक्स गॉड... उर्वशी नाही आली', दिल्लीच्या सामन्यात पोस्टर व्हायरल, अभिनेत्री म्हणाली... 


IPL 2023 : आयपीएलवर कोरोनाचं सावट, बीसीसीआयकडून खेळाडूंना लाखमोलाचा सल्ला