IPL 2023 COVID-19 BCCI Advisory : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. तीन वर्षानंतर पुन्हा एकदा होम आणि अने फॉर्मेटमध्ये आयपीएल स्पर्धा होत आहे. देशभरातील प्रत्येक क्रीडा प्रेमी आयपीएलचा आनंद घेत आहे. पण अशातच भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढलेय. आज देशभरात जवळपास सहा हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. प्रत्येक आठव्याला कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला बीसीसीआयने खेळाडूंना दिला आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, गुरुवारी देशभरातील सक्रीय रुग्णांची संख्या 25 हजारांवर गेली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता बीसीसीआयने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेने बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य प्राथमिक जबाबदारी आहे. सरकारकडून जी नियमावली येईल, त्याचे पालन केले जाईल, असेही बीसीसीआयने म्हटलेय.


आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण - 
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली. आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा पढील काही दिवस आयपीएल समालोचनापासून दूर असतील. आयपीएलमध्ये आणखी कुणाला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बीसीसीआयकडून काळजी घेतली जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून येणाऱ्या नियमांचे पालन करण्यात येईल, असेही सांगण्यात येतेय. 
 
आयपीएलमध्ये आतापर्यंत काय काय झाले?


आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत सध्या गुजरातचा संघ आघाडीवर आहे. गुजरातने दोन सामन्यात मोठा विजय नोंदवला आहे. पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबनेही आपल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पण सरसर नेट रनरेटच्या आधारावर गुजरातचा संघ आघाडीवर आहे. आरसीबीने एक सामना खेळला असून त्यामध्ये त्यांनी विजय नोंदवला आहे. आज आरसीबी आणि कोलकाता यांच्यामध्ये इडन गार्डनवर सामना रंगणार आहे. पर्पल आणि ऑरेंज कॅपमध्येही बराच बदल झालाय. ऑरेंज कॅप चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याच्या डोक्यावर आहे. तर पर्पल कॅप लखनौच्या मार्क वूड याच्या डोक्यावर आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत.