Avesh Khan Breaching Code of Conduct IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात रोमांचक लढत झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी (RCB) संघाने 212 धावा ठोकल्या आहेत. आरसीबीच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 30 धावांपूर्वीच तीन गडी गमावले. पण नंतर लखनौच्या काही मधल्या फळीतील फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि शेवटच्या चेंडूवर एक विकेट शिल्लक असताना त्यांनी सामना जिंकला. हा लखनौचा ऐतिहासिक विजय होता. पण, सामना जिंकल्यानंतरही आनंद साजरा करतानाची एक चूक लखनौच्या एक खेळाडू महागात पडली आहे.
जिंकल्याचा आनंद साजरं करणं पडलं महागात
लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू आवेश खानचा सामन्याच्या शेवटच्या चेंडू फटका मारता आला नाही, पण त्याने एक धाव काढून आपल्या संघाला या नखशिखांत सामन्यात विजय मिळवून दिला. अटीतटीच्या लढतीत विजयानंतर लखनौ संघाने जल्लोष केला. या सेलिब्रेशनमध्ये आवेश खान खूप उत्तेजित झाला आणि असं काही केलं की, ज्याचे परिणाम त्याला आता भोगावे लागत आहेत.
आवेश खानने हेल्मेट जमिनीवर आदळलं
या सामन्यात 213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाला शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धावांची गरज होती. लखनौच्या 9 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत लखनौने सामना जिंकला. विजयी धाव पूर्ण केल्यानंतर आवेश खानने हेल्मेट काढून जोरात जमिनीवर फेकलं. त्याच्या या कृत्याबद्दल त्याला आता बीसीसीआयनं फटकारलं आहे.
कार्तिकची ही चूक आरसीबीला महागात
आवेश धावण्यासाठी गेला तेव्हा आरसीबीचा विकेटकिपर दिनेश कार्तिककडे त्याला धावबाद करण्याची चांगली संधी होती. पण इथे कार्तिककडून फिल्डींगमध्ये मोठी चूक केली. कार्तिकला चेंडू पकडायचा होता आणि फक्त विकेट मारायची होती, पण तो चेंडू पकडण्यात अपयशी ठरला आणि लखनौच्या फलंदाजांनी धाव घेत एक धाव पूर्ण केली.
आवेश खानला आयपीएल प्रशासकीय समितीने फटकारलं
शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना एका विकेटने जिंकल्यानंतर, आवेश खाननं त्याचं हेल्मेट काढलं आणि जमिनीवर जोरदार आदळलं. हे कृत्य म्हणजे आयपीएल आचारसंहितेतील नियमांचे उल्लंघन आहे. यामुळेच त्याला आयपीएल प्रशासकीय समितीने फटकारलं आहे. आवेश खान आता लेव्हल-1 गुन्ह्यात दोषी आढळला आहे. त्यानं आपली ही चूक मान्य केली आहे.
आवेश खानच्या 'त्या' चुकीची शिक्षा लखनौला मिळणार?
लेव्हल-1 च्या गुन्ह्यांतर्गत कोणत्याही खेळाडूला फटकारण्यासोबत 50 टक्के मॅच फी कापण्याची तरतूद आहे. या चुकीची पुनरावृत्ती केल्यावर, खेळाडू लेव्हल-2 अंतर्गत दोषी आढळेल. अशा वेळी, नियमानुसार 50 ते 100 टक्के सामना शुल्क कापण्यात येईल. तसेच ही चूक पुन्हा घडल्यास खेळाडूवर काही सामन्यांसाठी त्याच्यावर बंदीचीही तरतूद आहे. असं झाल्यास लखनौ संघाची अडचणी वाढू शकते.