Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीला (LSG  vs RCB) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने शेवटच्या चेंडूवर हा रोमांचक सामना जिंकला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा थरारक सामना पार पडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघमध्ये गडगडला पण शेवटी लखनौने आरसीबीवर एक गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.


लखनौ (LSG) संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बंगळुरूचा (RCB) अवघा एक गडी राखून पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. या सामन्यात लखनौच्या निकोलस पुरननं नवा विक्रम केला. निकोलस पुरनने (Nicholas Pooran) आयपीएल (IPL 2023) मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. त्याने 15 चेंडूत 50 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूत आरसीबीच्या तोंडातील सामना लखनौच्या झोळीत टाकला. 19 चेंडूत 62 धावांची खेळी करणारा निकोलस पूरनला सामनावीर म्हणजे 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of The Match) ठरला.


लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने कर्णधार फाफच्या नेतृत्वाखाली 212 धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण तो अमित मिश्राचा बळी ठरला. कोहलीने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. फाफने 46 चेंडूत 171.74 च्या स्ट्राईक रेटने 79 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही 29 चेंडूत 203.45 च्या स्ट्राईक रेटने 59 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 3 चौकार आणि 6 षटकार ठोकले. 


शेवटच्या षटकातील थरार 


लखनौला शेवटच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज होती आणि 3 विकेट शिल्लक होत्या. आरसीबीसाठी हर्षल पटेलने शेवटचे षटक टाकण्यासाठी आला आणि सामन्याचा खरा थरार सुरू झाला. हर्षल पटेलच्या पहिल्याच चेंडूवर जयदेव उनाडकटने 1 धाव घेतली आणि मार्क वुड स्ट्राईकवर आला. हर्षलच्या दुसऱ्या आणि सर्वोत्तम चेंडूवर मार्क वुड बोल्ड झाला. त्यानंतर रवी बिश्नोई फलंदाजीसाठी मैदानात आला, त्याने तिसऱ्या चेंडूला बॅटने स्पर्श केला आणि दोन धावा काढण्यासाठी पळ काढला. चौथ्या चेंडूवरही रवीने एक धाव घेत धावसंख्या बरोबरी केली. आता लखनौला विजयासाठी 2 चेंडूत 1 धाव हवी होती आणि जयदेव उनाडकट स्ट्राइकवर होता.


हर्षलने पाचवा चेंडू टाकला आणि जयदेवने मिडऑनच्या दिशेने एक शॉट मारला आणि तो कर्णधार फाफ डू प्लेसिसने झेलबाद झाला. आता लखनौला विजयासाठी एका चेंडूवर एक धाव हवी होती आणि त्यांच्याकडे फक्त एक विकेट शिल्लक होती.


हर्षलने शेवटच्या चेंडूवर मंकडिंगच्या पद्धतीने बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला, पण पंचांनी सांगितलं की तो चेंडू टाकण्यासाठी खूप पुढे गेला होता, त्यामुळे रनआउट वैध नाही. हर्षलने पुन्हा एकदा सहावा चेंडू टाकला आणि तो चेंडू बॅटला न आदळता विकेटकीपर दिनेश कार्तिककडे गेला. पण तो शेवटचा चेंडू त्याला झेलता आला नाही. त्यानंतर दिनेश कार्तिकने चेंडू पकडला आणि थ्रो केला तोपर्यंत आवेश खान आणि बिश्नोईने एक धाव घेत सामना लखनौच्या नावावर केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : लखनौ विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलची '100 नंबरी' कामगिरी, दोन विकेट घेत आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी