IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं (RR) हैदराबादला (SRH) पराभूत केलं. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थाननं हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागलीय. ज्यामुळं हैदराबादचे चाहते निराश झाले आहेत. यातच हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.


पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 29 मार्च रोजी खेळण्यात आलेल्या राजस्थानविरुद्ध सामन्यात हैदराबादच्या संघाला स्लो ओव्हर रेट केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे, असं आयपीएलनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावरही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठवण्यात आला होता. 


राजस्थानविरुद्ध हैरदाबादची कामगिरी
हैदराबादविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं.  यादरम्यान कर्णधार संजू सॅमसननं अर्धशतक झळकावलं. त्यानं 27 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं 55 धावा केल्या. तर, हेटमायरनं धडाकेबाज खेळी करताना 13 चेंडूत 32 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघ 20 षटकात 7 विकेट्स गमावून केवळ 149 धावापर्यंत मजल मारू शकला. हैदराबादकडून एडिन मार्करामनं 57 धावांची शानदार खेळी केली. तर, वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 14 चेंडूत 40 धावा केल्या. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.


हैदराबादचा पुढील सामना कोणाशी?
हैदराबादचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा संघ कशी कामगिरी करतो? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha