Shoaib Akhtar On Umran Malik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या यादीत सनरायजर्स हैदराबादचा वेगवाग गोलंदाज उमरान मलिकच्या नावाचाही समावेश आहे. त्यानं आपल्या वेगानं सर्वांना प्रभावित केलं आहे. उमरान मलिक सातत्यानं 150 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी करताना दिसत आहे.  यंदाच्या हंगामात त्यानं आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकलाय. ज्याचा वेग 157 किलोमीटर प्रतितास होता. उमरान मलिकची गोलंदाजी पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं मोठं वक्तव्य केलं आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरनं 161.3 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केल्याची नोंद आहे. दरम्यान, शोएब अख्तरच्या या विक्रमाला तब्बल 20 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, अजूनही त्याचा विक्रम अबाधित आहे. 


शोएब अख्तर काय म्हणाला?
नुकतीच शोएब अख्तरनं  स्पोर्ट्सकीडा या स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उमरान मलिकच्या गोलंदाजीवर भाष्य केलं. "मला उमरान मलिकची खूप मोठी कारकीर्द पाहायची आहे. नुकतेच एका व्यक्तीनं माझं अभिनंदन केलं होतं की, माझ्या रेकॉर्डला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला हा विक्रम मोडता आला नाही. हा विक्रम मोडला पाहिजे. उमराननं माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. परंतु, विक्रम मोडण्याच्या नादात त्यानं हाडं मोडून घेऊन नयेत म्हणजे झालं. तो तंदुरुस्त राहो हीच माझी प्रार्थना आहे. त्याला दुखापत होऊ नये".


टी-20 विश्वचषकात उमरानच्या निवडीबद्दल अख्तर म्हणाला...
आगामी टी-20 विश्वचषकात उमरानच्या निवडीबद्दल अख्तर म्हणाला की, "त्याला भारतीय संघात स्थान मिळालं पाहिजे. दरम्यान, 150 किलोमीटर प्रतितासानं गोलंदाजी करणारे काहीच गोलंदाज शिल्लक राहिले आहेत. उमरान मलिक सातत्यानं 150 किलोमीटर प्रतितासानं गोलंदाजी करत आहे. त्याला पाहून मला आनंद झाला. मला नवीन खेळाडूंना या वेगानं गोलंदाजी करताना पहायचं होतं.फिरकीपटूंना बघून आता कंटाळा आला आहे", असंही त्यानं म्हटलं आहे. 



हे देखील वाचा-