MI vs RR, IPL 2022: नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला 23 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 170 धावांपर्यंत मजल मारता आली.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. जॉस बटलरसोबत संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आलेल्या यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं (7 धावा) संघाचा डाव सावरला. परंतु, सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडीकलनं विकेट गमावली. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनही आक्रमक खेळी केली. परंतु, त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पोलार्डच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. मात्र, एकाबाजूनं जॉस बटलरनं आपली आक्रमक खेळी सुरूच ठेवली. 15 षटकानंतर हेटमायरनंही मुंबईच्या गोलंदाजी शाळा घेतली. 14 चेंडूत त्यानं 35 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला बुमराहनं माघारी धाडलं. त्यानंतर लगेच जसप्रीत बुमराहनं जॉस बटलरच्या आक्रमक खेळीला पूर्णविराम लावलं. त्यानंतर रियान पराग (4 चेंडू 5 धावा), आर. अश्विन 1 धाव, नवदीप सैनी 2 तर, ट्रेन्ट बोल्टनं नाबाद एक धाव केली. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टी. मिल्सनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले. तर, पोलार्डनं एक विकेट्स मिळवली. 


194 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईचा रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. परंतु, या सामन्यातील दुसऱ्याच षटकात रोहित शर्मानं त्याची विकेट्स गमावली. रोहित शर्मा फक्त दहा धावा करुन झेलबाद झाला. दरम्यान, 52 धावांवर मुंबईच्या संघानं दोन विकेट्स गमावली. त्यानंतर  इशान किशन आणि तिलक वर्मा मैदानावर पाय रोवले. या दोघांनी मिळून मुंबईच्या संघाचा स्कोर 100 पर्यंत नेला.  मैदानावर धमाकेदार खेळ करत ईशान किशननं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 42 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या आहेत. तिलक वर्मानंही शानदार खेळ केला. मात्र, आर. अश्विनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा त्रिफळा उडाला. तिलक वर्मानं 33 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. युजवेंद्र चहलने दोन मोठ्या फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक होता. 19 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असताना राजस्थानच्या गोलंदाजांनी पोलार्डला रोखून ठेवलं. पोलार्डने शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र, शेवटच्या षटकात 29 धावांची गरज असताना मुंबईच्या संघाला 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha