IPL 2022, RR vs MI : राजस्थानचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने मुंबईविरोधात वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. बटलरने 67 चेंडूत शतक झळकावले. या खेळीदरम्यान बटलरने 11 चौकार आणि पाच षटकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना बटलरने अनुभव पणाला लावत संघाची धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराहने बटलरचा अडथळा दूर केला. पण तोपर्यंत बटलरने आपले काम पूर्ण केले होते. जोस बटलरने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले आहे. बटलरचे आयपीएलमधील हे दुसरं शतक आहे. याआधी बटलरने 2021 मध्ये हैदराबादविरोधात 124 धावांची खेळी केली होती. दरम्यान, जोस बटलरची मुंबईविरोधातील सर्वोच्च धावसंख्या झाली आहे. तर आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या झाली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानकडून विस्फोटक सलमी देण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जयस्वालला बाद करत राजस्थानला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पड्डिकल यालाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पड्डीकल अवघ्या सात धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना बटलरने मात्र संघाचा डाव सावरला. जोस बटलरने यशस्वी जयस्वालसोबत 13 धावांची सलामी भागिदारी केली. त्यानंतर पड्डीकलसोबत 35 , संजू सॅमसनसोबत 82 आणि हेटमायरसोबत 53 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.
मुंबईविरोधात बटरची फटकेबाजी
मुंबई इंडियन्सविरोधात जोस बटलर याने आतापर्यंत वादळी खेळी केली आहे. मादील पाच डावात बटलरने तीन अर्धशतकं आणि एक शतक लगावले आहे. 100(68), 41(32), 70(44), 89(43), 94*(53) मागील पाच डावात बटलरने मुंबईविरोधात फटकेबाजी केली आहे.