IPL 2022: भारताचा अनकॅप युवा क्रिकेटपटू तिलक वर्मानं (Tilak Varma) मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदापर्ण केलंय. 19 वर्षाच्या तिलक वर्माचं मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनं खुलेपणाने कौतुक केलं होतं.आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिलक वर्माची जोरदार चर्चा रंगली होती. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये मुंबईनं त्याला 1.70 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिलक वर्माला आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करायची आहे. तसेच त्याचे भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न आहे.एका सामान्य कुटुंबापासून ते रातोरात प्रकाशझोतात येणाऱ्या टिळक वर्माची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.
तिलक वर्माचे वडील नंबूरी नागराजू हे हैदराबादमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. त्यांना आपल्या मुलाचे क्रिकेट कोचिंग चालू ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याचे प्रशिक्षक सलाम बायश यांनी त्याचा सर्व खर्च उचलला. त्याला योग्य प्रशिक्षण दिले आणि त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला क्रिकेटचे सर्व साहित्यही दिले. मुंबईच्या संघात दाखल होण्यापूर्वी तिलक वर्माला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थानच्या संघानं तिलक वर्मावर बोली लावली होती. अखेर मुंबईच्या संघानं त्याला 1.7 कोटीत विकत घेतलं. त्याची मूळ किंमत 20 लाख होती. तिलक वर्माला मुंबईच्या संघानं खरेदी केल्यानंतर क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं तिलक वर्माला विकत घेतल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया कशी होती? हे त्याला विचारलं असता तो म्हणाला की, माझी मुंबईच्या संघात निवड झाल्यानंतर मी लगेच माझ्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी आम्ही सर्व निशब्द झालो होतो. तो माझ्या जीवनातला सर्वात भावूक क्षण होता.
या वर्षाच्या सुरुवातीला अंडर-19 एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या विजयी भारतीय संघाचा भाग असलेल्या हैदराबादच्या क्रिकेटपटूला त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्याला मूलभूत गोष्टींसाठी प्रतीक्षा करावी लागत होती."मी तुटलेल्या बॅटनं खेळत राहिलो. तुटलेल्या बॅटनं मी अंडर-16 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. जेव्हा माझ्या प्रशिक्षकानं हे पाहिले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी विकत घेतल्या. आज मी काही आहे, ते माझे प्रशिक्षक सरांमुळंचं आहे, असंही तो म्हणाला होता.
हे देखील वाचा-
- MI vs DC IPL 2022 : दिल्लीने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फंलदाजी
- IND vs SA Womens: थरारक लढतीत आफ्रिकेची बाजी, भारतीय महिला संघाचा पराभव, भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- IPL 2022 Delhi vs Mumbai : आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha