IPL 2021 : यंदाच्या वर्षीची आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशात कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमध्येही काही रुग्णांना या विषाणूची लागण झाल्यामुळं हा निर्णय़ घेण्यात आल्याचं कळत आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आली असून, पुढील काळात त्यासाठीच्या नव्या तारखा जाहीर होऊ शकतात. पण, सध्या प्राधान्य हे खेळाडू आणि त्यांच्या आरोग्यालाच देण्यात आलं आहे. 


खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि इतरही व्यक्तींची पूर्ण जबाबदारी बीसीसीआय घेत असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं आहे. 






बायो बबल, सातत्यानं होणाऱ्या कोरोना चाचण्या आणि प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगूनही आयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणूनं शिरकाव केलाच. खेळाडूंच्या मनात असणारी भीती सार्थ ठरली आणि कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाली. सोमवारी यासंदर्भातील माहिती समोर आली. ज्यामुळं कोलकाता विरुद्ध बंगळुरु हा सामना रद्द करण्यात आला. तर, संघातील इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला. आयपीएलमध्ये कोरोनानं शिरकाव करण्यापूर्वीच काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंतेचा सूर आळवत या स्पर्धेतून माघारही घेतल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र हे संकट आणि अधिकाधिक खेळाडूंना होणारी कोरोनाची बाधा पाहाता बीसीसीआयकडूनच ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं प्रसिद्ध केलं आहे.


Char dham Yatra 2021 : कोरोना संकटात सुरु होणार चारधाम यात्रा ; नवी नियमावली लागू 


आतापर्यंत खेळवण्यात आले 29 सामने


आयपीएलच्या टी20 टूर्नामेंटमध्ये या सीझनमध्ये 29 सामने खेळवण्यात आले आहेत. याचं आयोजन बायो सिक्योर एन्वायरमेंटमध्ये करण्यात येत आहे. ज्यामध्ये खेळाडूंवर बाहेर येण्या-जाण्यासाठी बंदी असते. त्याचप्रमाणे इतरही अनेक बंधन लादण्यात आलेली असतात.


दरम्यान, आतापर्यंत आयपीएलच्या आयोजनात कोणतीही बाधा आली नव्हती. पण कोरोनाच्या संकटानं पुरतं चित्र बदललं. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने काही दिवसांपूर्वी बायो बबलचे नियम कठोर केले होते. खेळाडूंच्या दर दोन दिवसांनी कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. तसेच खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवण आणण्यासाठीही मनाई केली होती.